
औरंगजेबाशेजारी तुम्हालाही गाडू : संजय राऊत
मुंबई : एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने ‘एमआयएम’ नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेले आव्हान असून आपण स्वीकारले असल्याचे म्हटले आहे.
औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकले आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राला खिजवण्यासाठी या कबरीवर गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे ओवेसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. पण औरंगजेबाला याच मातीत मराठ्यांनी गाडले होते, हे विसरू नका असा इशारा दिला.
काश्मिरी पंडिताच्या हत्येबाबत ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात सातत्याने काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काल एक तरुण सरकारी कर्मचारी काश्मिरी पंडिताची आपल्या कार्यालयात काम करत असताना हत्या झाली. काश्मीरमधील स्थिती पुन्हा एकदा बिघडविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. काही काळ राजकारण दूर ठेवले पाहिजे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, काश्मिरी पंडितांचे प्रश्न हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उचलून तुम्ही विचलित करू शकत नाही. देशाचे याकडे बारीक लक्ष आहे. शिवसेना याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे. जे शक्य असेल ते आम्ही करु. पण सरकार काय करत आहे. सरकारला इतर विषय बाजूला ठेवून काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेकडे पाहाते लागेल.
एकनाथ शिंदे यांच्याकडूनही निषेध
औरंगजेब स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानांची नासधूस केली. ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी भेट देतात. ओवेसींनी जे केले त्याचा मी निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आेवेसींना औरंगजेबाकडे पाठवतो - नीतेश राणे
मुंबई : ‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची औरंगजबाच्या कबरीला भेट दिल्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून, या भेटीचा निषेध करीत भाजप नेत्यांनी ओवेसी यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. ‘पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, ओवेसींना औरंगजबाकडे पाठवून दाखवतो,’ असे ट्विट करून भाजप आमदार नीतेश राणे यांनी ओवेसी यांना आव्हान दिले.
ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने भाजप नेते संतप्त झाले असून, ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘ओवेसींना माहीत आहे, औरंगजेबाच्या थडग्यापुडे नाचलो, तरी महाराष्ट्रात मला दोन पायांवर फिरता येईल. कारण, या राज्यात नार्मर्दाचे सरकार आहे. याला म्हणतात, यांचे खरे हिंदुत्व,’ असेही राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राणे यांच्यासह भाजप इतर नेत्यांनीही ओवेसी यांना लक्ष करून, या प्रकराचा निषेध केला. दुसरीकडे, ओवेसी आणि एमआयएमचे नेतेही उत्तरे देत असल्याने भाजप आणि एमआयएमचे नेते आमनेसामने आले आहेत.
Web Title: Mim Akbaruddin Owaisi Aurangzeb Tomb Issue Shivsena Sanjay Raut Nitesh Rana Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..