esakal | एमआयएमला हव्यात 'इतक्या' जागा!
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयएमला हव्यात 'इतक्या' जागा!

लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी बजावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागा वाटपावरून वाद सुरू झाला आहे.

एमआयएमला हव्यात 'इतक्या' जागा!

sakal_logo
By
ज्ञानेश्वर बिजले

पुणे : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी बजावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागा वाटपावरून वाद सुरू झाला आहे. एमआयएमने राज्यात 76 जागांची मागणी केली असून, त्यांच्यासाठी तेवढ्या जागा सोडण्याची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची तयारी नाही. या दोन पक्षांच्या निर्णयाचा राज्यातील निवडणुकीच्या राजकीय घडामोडींवर निश्‍चित परिणाम होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या आठ दहा जागांवर परिणाम झाला. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील औरंगाबादचे खासदार झाले. मात्र, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत वादाला तोंड फुटले. मुस्लिम समाजाची मते आघाडीच्या उमेदवारांना मिळाली नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण माने आघाडीतून बाहेर पडले. 

एमआयएमचे दोघेजण 2014 मध्ये आमदार झाले. त्यापैकी एम्तियाज जलील आता खासदार झाले. विरोधकांतील मतविभागणी आणि एकगठ्ठा मुस्लिम समाजाचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू ठरली. लोकसभा निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन आघाडीचीही मदत झाली. आता एमआयएमने राज्यात मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. मुख्यत्वे मराठवाड्यात त्यांची जादा जागांची मागणी आहे. 

वंचित बहुजन आघाडीही विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात लक्ष ठेवून आहे. त्यामुळे एमआयएमला काही जागा देण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, 76 जागा देण्याची त्यांची तयारी नाही. आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यात गेल्या महिन्यात पुण्यात चर्चा झाली होती. मात्र, जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

दरम्यान एमआयएमने प्रचाराला सुरवात केली आहे. 
वंचित विकास आघाडी एमआयएम यांच्यातील फुटीचा थेट परिणाम कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर होणार आहे. त्यामुळे, राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यातील चर्चेकडे लागले आहे. 

loading image
go to top