अबतक 71, दिल मॉंगे 10 मोअर 

devendra-fadnavis
devendra-fadnavis

मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर परिषद निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना 11 पैकी किमान 10 जागा जिंकायच्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी पक्षांबरोबरच सहकारी पण स्पर्धक शिवसेनेने जिंकलेल्या जागांची एकत्रित बेरीज 81 आहे. अन्य पक्षांनी जिंकलेल्या सर्व नगराध्यक्षपदांइतकीच एकट्या भाजपची मजल आहे, हे दाखवण्यासाठी किमान 10 आणि त्यांना मागे टाकण्यासाठी उरलेले एक नगराध्यक्षपदही भाजपला जिंकायचे आहे. 

भाजपने सर्व पक्षांच्या एकत्रित बेरजेपेक्षा जास्त किंवा निदान समसमान जागा जिंकल्या आहेत, हे दिल्लीला कळवण्यासाठी आणि अर्थातच राज्यातील जनतेसमोर ही कामगिरी पेश करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कामाला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नऊ, तर गोंदियातील दोन नगर परिषदांचे मतदान अद्याप बाकी आहे. या 11 ही नगर परिषदांमध्ये मुख्यमंत्री स्वत: मुक्‍काम ठोकून प्रचार करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण वातावरण गेल्या काही वर्षांत भाजपला अनुकूल असले, तरी नगर परिषदांवर मात्र भाजपला ताबा मिळवता आला नव्हता. कायम दूर असलेली अर्ध ग्रामीण, अर्ध नागरी भागातील सत्ता हातात यावी, यासाठी जंग जंग पछाडले जाते आहे. 

गोंदियातही हवा 
भाजपची विजययात्रा रोखण्यासाठी सावनेर भागात कॉंग्रेस नेते सुनील केदार, नरखेड-काटोल परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख आणि उमरेड परिसरात माजी मंत्री राजेंद्र मुळक आपापले गड राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात आजवर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांचे वजन होते; मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या परिणय फुके यांनी विधान परिषद निवडणूक जिंकल्याने या भागातही भाजप पर्व सुरू झाले आहे. या जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदा भाजप जिंकेल, असा विश्‍वास भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्‍त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सुरू झालेल्या परिवर्तनाला जनता साथ देईल, असेही ते म्हणाले. 

गडकरींच्या इंजिनाची मदत 
भाजपने जिंकलेल्या नगर परिषदांपैकी निम्मे नगराध्यक्ष विदर्भातील आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या "मिशन 10' अभियानाला सर्वाधिक मोलाचे पाठबळ दिले आहे, ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. त्यांनी नागपूर ग्रामीणवरील भाजपचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न सुरू केले आहेत. गडकरी यांच्या सभांना श्रोत्यांची मोठी गर्दी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com