esakal | 'पडळकर नवीन उगवलेलं गवत, त्यांना अजून मूळ सापडलं नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

'पडळकर नवीन उगवलेलं गवत, त्यांना अजून मूळ सापडलं नाही'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महाविकास आघाडी सरकारवर (mahavikas aghadi government) सातत्याने टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले. हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती' शोधण्यासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यावरून आता ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay wadettiwar) यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षण : निवडणुका पुढे ढकलाव्या याबाबत एकमत - वडेट्टीवार

''पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता राजकारणात आले आहेत. ते नवीन उगवलेलं गवत आहेत. त्यांना अजून आपलं मूळ सापडलेलं नाही. अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला हा व्यक्ती आहे. ती कमिटी स्थापन करायचं काम मी केलं आहे. त्या पडळकरांना काय माहीत आहे?,'' अशी जहरी टीका वडेट्टीवारांनी केली.

पडळकरांनी पत्रात नेमकी काय मागणी केली होती?

"महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलंय, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आलाय. शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यां अशी उदहारणं त्यांनी दिली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही. १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील 'दिग्गज' ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ या समितीचे अध्यक्ष आहेत. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, अशा दिग्गजांची मांदीयाळी या समितीत असताना यांनी वर्षभरात ओबीसी प्रश्नांवर नेमका कोणता अभ्यास करून अहवाल सादर केलाय, हे कळायला मार्ग नाही. म्हणूनच सामान्य ओबीसी जनतेला ही फक्त 'दिग्गज' ओबीसी नेत्यांची 'मांदीयाळी' नसून ही 'निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असे वाटायला लागले आहे" अशी उपरोधिक टीका पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

loading image
go to top