

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सध्या सत्र परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत ‘बीए’च्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये कवी नारायण सुर्वे यांची कविता चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियातून प्रसारित केला जात असून अनेकांनी त्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. मात्र, पेपरात कविता चुकीची आल्यासंदर्भात कोणतीही लेखी तक्रार आली नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेची सुरवात ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दु:खात गेले...हिशेब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे’ अशी आहे. पण, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या विद्यापीठाच्या ‘दीर्घ उत्तरे लिहा’मधील कवितेचे भावसौंदर्य उलगडून दाखवा, या प्रश्नातील कवितेची सुरवात ‘डोळे दिवस वाट पाहण्यात गेले, डोळे दु:खात गेले...विशेष करून आहे आता किती महिनेत डोईवर उन्हाळे’ अशी आहे.
त्यानंतर ‘शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली...भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली’ असे आवश्यक असतानाच विद्यापीठाच्या प्रश्नात ‘शेकडो वेळा वंद आला, तारे फुटले, राम घड झाली शाकरीला चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली’ अशी चूक झाली आहे. याशिवाय आणखी खूप चुका असल्याचे दिसत आहे. या चुकीवरून आता साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण, विद्यापीठाने अजूनपर्यंत त्यासंदर्भात आपल्याकडूनच चूक झाल्याचे कबूल केलेले नाही.
अद्याप विद्यापीठाकडे कोणाचीही तक्रार प्राप्त नाही
पदवीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याबद्दल परीक्षा विभागाकडे विचारणा केली आहे. पण, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत तशी चूक झाल्यासंदर्भात अद्याप विद्यापीठाकडे कोणाची तक्रार प्राप्त झालेली नाही.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
साडेतीन हजार प्रश्नपत्रिकांपैकी काहीत चुका
‘बीए’च्या मराठी विषयाच्या पेपरसाठी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी बसले होते. त्यातील चार ते पाच प्रश्नपत्रिकांमध्ये कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील काही शब्द चुकीचे प्रिंट झाल्याचे बोलले जात आहे. पण, एकाही विद्यार्थ्याने त्यासंदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केलेली नाही किंवा कोणीही निवेदन दिलेले नाही. त्यामुळे नेमकी चूक झाली की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सध्या सोशल मीडियातून मात्र विद्यापीठाकडून चूक झाल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.