

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सदर बझार पोलिसांत दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कल्याणशेट्टी यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना वाढीव पोलिस बंदोबस्त द्यावा, अशा मागणीची निवेदने विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शहर-ग्रामीण पोलिसांना दिली आहेत. यावर आता पोलिस अधीक्षक कार्यालयाने अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. अहवालानंतर त्यांना वाढीव बंदोबस्त दिला जाणार आहे.
शुक्रवारी (ता. ७) सोलापूर शहरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये आमदार कल्याणशेट्टी कपडे खरेदीसाठी आले होते. ते कपडे खरेदीसाठी शोरूममध्ये गेले आणि त्यांच्या गाडीचा चालक गाडीतच थांबला होता. त्याच्याजवळ श्रीशैल हुळ्ळे (मूळचा रा. वडगाव, ता. अक्कलकोट) व प्रभाकर फुलारी (रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) हे दोघे आले. त्यातील हुळ्ळे म्हणाला, ‘तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, तुला पैसे देतो, मी पुढचे बघतो.’ तर हुळ्ळेचा चालक प्रभाकर फुलारी म्हणाला, ‘साहेब काय म्हणतात नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे.’ आमदार कल्याणशेट्टी यांचा चालक आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) याने सर्व हकीकत सांगितली. चर्चेअंती चालक सुरवसे याने सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि दोघांविरुद्ध फिर्याद दिली.
पोलिसांनी यात प्रभाकरला काही तासांत अटक केली आणि न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. दरम्यान, आमदार कल्याणशेट्टी यांना गोळी घालून मारण्याची धमकी भरदिवसा दिल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावरून त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदने दिली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार कल्याणशेट्टींना वाढीव पोलिस बंदोबस्त देण्यासंदर्भातील निर्णय पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
फुलारी न्यायालयीन कोठडीत, हुळ्ळे सापडेना
अटकेतील प्रभाकर फुलारीची पोलिस कोठडी बुधवारी (ता. १२) संपली. सदर बझार पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे, गुन्ह्यातील मुख्य संशयित श्रीशैल हुळ्ळे अजूनही पोलिसांना मिळाला नसून, पोलिसांची चार पथके त्याच्या मागावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.