'त्यांना अजून पवार कळलेच नाहीत'; अजितदादांच्या पार्थंबाबत बोलताना रोहित पवार काय म्हणाले? Rohit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar vs Gopichand Padalkar

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप जर पीडीपीसोबत जात असेल तर राजकारणात काहीही होऊ शकते; पण येथे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे.

Rohit Pawar : 'त्यांना अजून पवार कळलेच नाहीत'; अजितदादांच्या पार्थंबाबत बोलताना रोहित पवार काय म्हणाले?

सातारा : जिल्हा नियोजन समितीचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला नाही. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावमधील विविध विकासकामांचा साडेनऊ कोटींचा निधी स्थगित केला आहे. एकीकडे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असताना या ठिकाणच्या विकासकामांत राजकारण आणण्याची गरज नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाचे कान टोचले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार पवार काल साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट दिली. तेथील स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सातारा क्लबला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार पवार म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा नियोजन समितीचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला नाही. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावमध्ये विकासकामे करताना राजकारण आणण्याची गरज नाही. येथील विकासकामांचा साडेनऊ कोटी रुपयांचा निधी स्थगित केलेला आहे. एकीकडे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असताना या ठिकाणच्या विकासकामांत राजकारण आणण्याची गरज नाही.’’

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, ‘‘कोणीही येते आणि बोलून जाते. त्यांना पवारच कळलेले नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.’’ पार्थ पवार नाराज असून, ते राष्ट्रवादी सोडणार असल्याचे ते सांगतात, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, ‘‘पार्थ पवार (Parth Pawar) हा माझा भाऊ आहे आणि आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. जे कोण बोलत आहेत. त्यांना अजून पवार कळालेले नाहीत. त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळलेला नाही. त्यामुळे पवार ही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. राहिला प्रश्न बारामतीचा. त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. कारण लोक निर्णय घेतात. नेते निर्णय घेत नाहीत.’’

भाजप संविधानाच्या विरोधात

आगामी काळात अजित पवार भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री होऊ शकतात का, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, ‘‘राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप जर पीडीपीसोबत जात असेल तर राजकारणात काहीही होऊ शकते; पण येथे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे. कारण तो संविधानाच्या विरोधात जात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असे मला वाटत नाही.’’