'सनातन' हाच भारताचा राष्ट्रधर्म आहे, हे आता सगळ्यांनी मान्य करा; CM योगींचं मोठं विधान I Yogi Adityanath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath Ram Temple

धार्मिक कार्यक्रमात जात-धर्माचं बंधन झुगारून लोक परस्पर ऐक्याचं दर्शन घडवत आहेत.

Yogi Adityanath : 'सनातन' हाच भारताचा राष्ट्रधर्म आहे, हे आता सगळ्यांनी मान्य करा; CM योगींचं मोठं विधान

राजस्थानमधील जालोर इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलंय. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा संदर्भ देत ते म्हणाले, 'आमच्या धार्मिक स्थळांची कोणत्याही काळात विटंबना झाली असेल, तर त्याच्या जीर्णोद्धारासाठी मोहीम सुरू केली पाहिजे. आपला सनातन धर्म (Sanatan Dharma) हाच भारताचा राष्ट्रधर्म आहे हे आता सर्वांनी मान्य केलं पाहिजे.'

मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) शुक्रवारी राजस्थानच्या भीनमाल जालोर येथील नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बोलत होते. प्रभू राम जन्मस्थानी भव्य मंदिराचं (Ram Temple) बांधकाम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

सीएम योगी म्हणाले, या धार्मिक कार्यक्रमात जात-धर्माचं बंधन झुगारून लोक परस्पर ऐक्याचं दर्शन घडवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपला देश सुरक्षित राहावा, गो-ब्राह्मणांचं रक्षण व्हावं हाच त्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमादरम्यान सीएम योगी यांच्यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मंदिर परिसरात रुद्राक्षाचं रोपटं लावलं.

योगी पुढं म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराची विटंबना झाली. याविरुद्ध पाचशे वर्षे संघर्ष झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नानं आता भगवान रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. हे मंदिर पुढील वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपात जगासमोर येणार आहे. या मंदिराच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचं त्यांनी आभार मानलं. हाच जोश इतर धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनात असायला हवा, असंही ते म्हणाले.