

cash Demand
sakal
प्रमोद बोडके
सोलापूर : पीए म्हणजे चहा पेक्षा किटली गरम, असे उपहासाने सांगितले जाते. महाराष्ट्र विधीमंडळाची अंदाज समिती सोलापुरच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी या समितीमधील काही आमदारांचे स्विय सहाय्यक (पीए) सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापूरच्या जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या बोलावून काही ‘पीए‘ अव्वाच्या सव्वा बोलू लागले आहेत. ‘पीएं‘चा हा अंदाज पाहून अधिकाऱ्यांचीच दमछाक झाल्याची चर्चा बुधवारी (ता. १९) प्रशासनात होती.
शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील जवळपास २७ आमदारांची अंदाज समिती उद्यापासून (ता. २०) तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. समितीमधील सदस्य आमदार सोलापुरात दाखल होण्यापूर्वीच काही आमदारांचे ‘पीए’ सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापुरातील अलिशान हॉटेल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांना बोलावून घेतले.
अधिकाऱ्यांना निरोप देताना त्यांनी विशेष काळजीही घेतली असल्याचे बोलले गेले. ‘तुमच्या विभागात खूप गडबडी दिसत आहेत, साहेब तुम्हाला फैलावर घेतील, तुमची तक्रार शासनाकडे करतील‘, अशी भाषा वापरून अधिकाऱ्यांकडे अव्वाच्या सव्वा रक्कमेची मागणी केल्याचीही चर्चा बुधवारी दिवसभर प्रशासनात होती. या ऑफरने भांबावलेल्या अधिकाऱ्यांची मात्र पुरती दमछाक झाली, असेही काहीजण बोलत होते.
समिती दौऱ्यापूर्वीच सोलापुरात संशयास्पद वातावरण
शासनाने दिलेल्या निधीचा योग्य वापर होतो की नाही?, शासकीय खर्चात काटकसर करणे, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा अहवाल शासनास सादर करणे यासह इतर कामे या समितीच्या माध्यमातून केली जात आहेत. ही समिती शनिवारपर्यंत (ता. २२) सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकत्रित बैठक, यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका यासह इतर शासकीय विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, बुधवारी दिवसभरातील चर्चेमुळे समितीचा दौरा सुरू होण्यापूर्वीच सोलापुरात संशयास्पद वातावरण झाले आहे.
धुळे, अहिल्यानगरमध्येही अशीच स्थिती
अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी अहिल्यानगरमध्ये अशाच पध्दतीने ‘किटली गरम’चा अनुभव तेथील अधिकाऱ्यांना आला होता. धुळे जिल्ह्यात मात्र या समिती सदस्याच्या पीएंनी केलेल्या ‘कामगिरी’वरून मोठे वादंग निर्माण झाले होते. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी तेथील विश्रामगृहाच्या एका खोलीत तब्बल पावणे दोन कोटींची रक्कम उघडकिस आणली होती, त्या पार्श्वभूमीवर या सोलापुरात काय घडते? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.