मनसेचा वर्धापन दिन यावर्षी मुंबईत नाहीतर या शहरात होणार!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा आणि ‘अजेंडा’ बदलल्यानंतर आखलेल्या नव्या रणनीतीनुसार मोठे कार्यक्रम मुंबईव्यतिरिक्त अन्य मोठ्या शहरांत घेतले जाणार आहेत. दरवर्षी मुंबईत होणारा मराठी भाषा दिन कार्यक्रम यंदा ठाण्यात, तर ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन सोहळा नवी मुंबईत होईल. नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला गोरेगाव येथे झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पक्षाच्या नव्या दिशेनुसार मोठे कार्यक्रम फक्त मुंबईत न घेता अन्य शहरांत घेतले जाणार आहेत. मनसेचा १४वा वर्धापन दिन ९ मार्चला नवी मुंबईत साजरा केला जाईल.एप्रिलमध्ये होणारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ध्यानात घेऊन पक्षाची बांधणी आणि विस्तारासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईबाहेर होणारा हा पहिलाच वर्धापन दिन सोहळा असेल. त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये आयोजित केला जाण्याची शक्‍यता आहे. 

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात होणार भारतातील गरिबी दूर

आत्तापर्यंत मनसेचे सर्व मुख्य कार्यक्रम मुंबईत होत असत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यात सर्वत्र कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पक्ष तळागाळात पोचण्यास मदत होईल. - शिरीष सावंत, नेते, मनसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS anniversary will not be held in Mumbai this year