'कोहिनूर'मध्ये 'राज' लटकणार?; चौकशीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

कोहिनूर मिलप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची सलग तीन दिवस 'ईडी'ने चौकशी केली. तसेच, त्यांच्या कंपनीतील भागीदार राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आली. राज ठाकरे यांना चौकशीसाठी आज बोलविण्यात आले आहे.

मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहिले आहेत. राज यांची चौकशी किती वेळ होणार हे अद्याप निश्चित नाही. राज यांच्या चौकशीच्या पार्श्‍वभूमीवर 'ईडी' कार्यालय आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही हजर आहेत.  

कोहिनूर मिलप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची सलग तीन दिवस 'ईडी'ने चौकशी केली. तसेच, त्यांच्या कंपनीतील भागीदार राजन शिरोडकर यांचीही चौकशी करण्यात आली. राज ठाकरे यांना चौकशीसाठी आज बोलविण्यात आले आहे. राज यांना 'ईडी'ने नोटीस पाठविल्यापासून मनसेतील वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासूनच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरवात केल्यामुळे राज यांनी काल शांततेचे आवाहन केले होते. आज सकाळी अनेक मनसे नेते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज यांनी बुधवारी मनसैनिकांना आवाहन करताना म्हटले होते, की आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाच्या बातमीने माझे मन व्यथित झाले आहे. मला "ईडी'ची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होते. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचे जसे माझ्यावर, पक्षावर प्रेम होते, तसेच तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे याची मला जाणीव आहे. पण, माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, की कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. या आधीदेखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत, त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण या प्रसंगावरदेखील मात करू हे नक्की. कालच्या माझ्या सूचनेनंतरदेखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असे मला कळले. तुमचे खरेच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही आणि काल मी जे सांगितले तेच पुन्हा सांगतो, तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. बाकी या विषयावर जे बोलायचे आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या,' असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray arrives at office of the Enforcement Directorate for Kohinoor mill case