
महाराष्ट्राचे गृहमंत्री चक्क खोटं बोलत आहेत, मनसेचा आरोप
'गृहमंत्र्यांनी भोंग्यांच्या विषयाला 'वळसे' देणं बंद करावं'
मागील बऱ्याच दिवसांपासून भोंग्यांमुळं राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसेने भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने राज ठाकरेंवर राजकीय वर्तुळातून टीका सुरु आहे. 4 मे रोजी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. यामुळे मनसे आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील राजकीय संर्घष टोकाला गेला. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट करत गृहमंत्री वळसे पाटील आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री खोटं बोलत असल्याची टीका काळे यांनी केली आहे.
हेही वाचा: भोंग्यांबद्दल बोलायला सुपारी दिली जाते; आव्हाडांची बोचरी टीका
मनसे नेते गजानन काळे म्हणतात, महाराष्ट्राचे गृहमंत्री चक्क खोटं बोलत आहेत. उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे अनधिकृत, विनापरवाना असलेले भोंगे पोलिस यंत्रणेने काढले पाहिजे. पण गृहमंत्री म्हणतात तसा न्यायालयाचा आदेश नाही. हा घ्या सूर्य आणि हा घ्या जयद्रथ. त्यामुळे आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी या विषयाला "वळसे" देणे बंद करावे, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून सुरु असलेल्या धरपकडीवरुन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतापले आहेत. 'सत्ता येत - जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही…' असे खडे बोल त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून सुनावले आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिल्यानंतर गृह विभागाने मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केल्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सध्या राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरूनही अनेक उलट सुटल चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला असून उत्तर भारतीयांचा राज यांनी अपमान केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वीच उत्तर भारतीयांची माफी मागावी. नाहीतर त्यांना अयोध्यात घुसू दिले जाणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण यांनी दिला आहे.
हेही वाचा: पेडणेकरांनी राणांना फटकारलं, म्हणाल्या वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्या...
Web Title: Mns Gajanan Kale Criticized To Dilip Walse Patil On Loudspeaker Supreme Court Decision
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..