मनसे विधानसभा निवडणूक लढवणार? उद्या महत्वाची बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकी नंतर राज ठाकरे निवडणूक लढवण्याबाबत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकी नंतर राज ठाकरे निवडणूक लढवण्याबाबत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुक उंबरठ्यावर आली असतांना राज ठाकरे यांनी मात्र निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.मनसेतील काही इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असली तरी राज ठाकरे यांचा हिरवा कंदील न मिळल्याने पदाधिकारी संभ्रमात आहेत.काही दिवसंपूर्वीक कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणुकीबाबत आढावा घेऊन काही दिवसांनी भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत रिंगणात काही उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.विशेष बाब म्हणजे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 12 वाजाता राजगडवर राज ठाकरे यांनी मुंबईच्या विभाग अध्यक्षाची बैठक बोलावली असून, या बैठकीनंतरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळत आहे. 

मनसे मोजक्याच जागा लढवणार? 
मनसे विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला तरी सर्व जागा न लढवता केवळ 50 ते 60 जागांवर निवडणूक लढणार असल्याचेह समजते.मुंबई, ठाणे,पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये मनसेचा जोर राहणार असून पंढरपूर आणि वणी या ग्रामीण भागामध्ये जिथे मनसेची ताकद आहे अशा ठिकाणी मनसे आपले उमेदवार देऊ शकते. मुंबईतील माहीम, विक्रोळी या भागात देखील मनसे आपला उमेदवार देणार आहे. 

काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा संभ्रम कायम? 
लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी काँग्रेस आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे यावेळी मनसे काँग्रेस आघाडी सोबत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र आघाडी बाबत काँग्रेसच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मनसेच्या एका नेत्याने सांगितले.मनसे सोबतच्या आघाडीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये देखील एकवाक्यता नसल्याचे समजते आहे. मात्र मनसे आघाडीमध्ये सहभागी नाही झाला तरी दोन्ही पक्षांचा काही जागांवर 'समझोता' होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS may contest Maharashtra Vidhansabha 2019 Election