Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Patil

Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान

मुंबईसह राज्याच्या अनेक मुख्य शहरात महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्यातील प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप-शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. अशातच महायुतीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलीय. हे नेते सतत एकत्र आल्याचं दिसून येतं आहे. यावरून आता महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील म्हणाले आहे.

हेही वाचा: Mumbai : शिंदे गटाच्या मेळाव्याच्या दिवशी मनसे आमदारांनी बॅनरबाजी

पुढे बोलताना राजू पाटील म्हणाले की, काही गोष्टी या राजकारण सोडून बघायला पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर सोबत येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झाला नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष दिलं गेलं असं राजू पाटील म्हणालेत.

मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्यामुळे आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण काही दिवसांपूर्वीच माननीय राजसाहेबांनी सांगितलं की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही हरकत नाही. राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण काही हरकत नसावी, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Mumbai : मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिवसेना भाजपला कानपिचक्या