मनसेची वाटचाल कट्टर हिंदुत्वाकडे

प्रशांत बारसिंग 
Tuesday, 4 February 2020

समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेण्याची पूर्वीची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) वाटचाल कट्टर हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली आहे.

मुंबई - समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेण्याची पूर्वीची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) वाटचाल कट्टर हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली आहे. देशातील घुसखोरांना हाकलून लावण्याच्या मागणीसाठी मनसेने आयोजित केलेल्या मोर्चात अन्य राज्यांतील कट्टर हिंदुत्ववादी संघटना सामील होण्याच्या शक्‍यतेने या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी तेरा वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली. या वेळी पक्षाच्या झेंड्यात हिरव्या आणि निळ्या रंगांचा समावेश होता. पक्षस्थापनेनंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आणत यश मिळविले होते. मात्र, त्यानंतर दहा वर्षांत पक्षाची वाढ झाली नाही; किंबहुना पक्षाला उतरती कळा लागली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर पक्षाला नवा आयाम देण्याचा निर्णय राज यांनी घेतला आणि २३ जानेवारी रोजी झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी आमूलाग्र बदलांची घोषणा केली. पक्षाच्या झेंड्याचा रंग भगवा करून हिंदुत्ववादाकडे पक्ष झुकत असल्याचे सूतोवाच केले होते.

माझा ‘डीएनए’च हिंदू असल्याचे राज यांनी त्या वेळी जाहीर करत देशातील घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारी ला मुंबईत मोर्चाची घोषणाही केली होती. 

पदाधिकाऱ्यांचे ‘वेट अँड वॉच’
यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनाही पक्षाची ही भूमिका पटलेली नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने पदाधिकारी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे त्यांच्याशी संवाद साधला असता दिसून आले. मनसेच्या मोर्चात देशभरातील अनेक हिंदुत्ववादी संघटना सामील होणार असल्याचे समजते. यात गेल्या पाच वर्षांत अन्य राज्यांत झालेल्या झुंडबळीच्या घटनांत सहभागी संघटनाही असल्याचे समोर आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा अजेंडा जाहीर केला आहे. त्यामुळे पक्षाला त्याच दिशेने जावे लागेल; परंतु फक्‍त हिंदुत्ववादाची भूमिका जनतेला मान्य होणार की नाही, यावर पक्षात संभ्रमावस्था आहे. देशात निर्माण झालेली झुंडबळीची परंपरा राज्यात सुरू झाली, तर पक्षाला ते परवडणारे नाही.
- मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्या सोबत असलेला पक्षाचा पदाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS move towards Hindu