Babasaheb Purandare: "खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा 'शिव'भक्त होणे नाही", राज ठाकरेंची भावुक पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns raj thackeray post babasaheb purandare death anniversary maharashtra news

Babasaheb Purandare: 'खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा 'शिव'भक्त होणे नाही', राज ठाकरेंची भावुक पोस्ट

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आदरांजली वाहीली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये पुरंदरे यांच्याविषयीच्या त्यांच्या भावनांना वाट मोकळी करू दिली आहे. "आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज." असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे राज ठाकरे यांनी लिहिलंय की, "बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली. "

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Asaduddin Owaisi : सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा; संतप्त ओवेसी म्हणाले; 'मुलं त्यांच्या…'

बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या कामात आलेल्या अडचणींविषयी राज ठाकरे यांनी लिहीलं की "छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. 'ह्या सम होणे नाही', असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा 'शिव'भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे, पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?" असे म्हटले आहे.

"असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन." असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: Shivsena: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! आता धनुष्यबाणासंदर्भात दिल्ली हायकोर्टानेही...