
'औरंगजेबी' प्रवृत्ती डोकं वर काढतील तेव्हा...; राज ठाकरेंनी व्हिडिओ पोस्टमधून दिला इतिहासाचा दाखला
मुंबई : औरंगजेब संदर्भातील एका पोस्टवरुन कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर मनसेनं आपली भूमिका मांडली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करत मनसेनं म्हटलं की, 'शिवछत्रपती' हा विचार आहे आणि जेव्हा जेव्हा 'औरंगजेबी' प्रवृत्ती डोकं वर काढतील तेव्हा तेव्हा 'शिवछत्रपती' हा विचार ह्या भूमीतून पुन्हा उसळी घेईल! (MNS take stand on Kolhapur Incident regarding Whatsapp status of Aurangzeb)
मनसेनं पोस्ट केलेल्या व्हिडिओत काय?
मनसेनं ट्विटरवर राज ठाकरेंच्या आवाजातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात, "शिवाजी महाराजाचं निधन झालं १६८० मध्ये, त्यानंतर १६८१ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला. पुढे १६८१ ते १७०७ हा काळ जर आपण पाहिला तर या २७ वर्षांच्या कालखंडात औरंगजेब महाराष्ट्रात होता.
या संपूर्ण काळात छ्त्रपती संभाजी महाराजांचं औरंगजेबासोबत युद्ध झालं. ताराराणी साहेब, संताजी-धनाजी, राजाराम महाराज यांच्यासोबत त्याचं २७ वर्षे युद्ध सुरु होतं. या २७ वर्षात औरंगजेबानं जी पत्र पाठवली आहेत. त्याला माहितीए आता शिवाजी महाराज नाहीत. पण या २७ वर्षात त्याला महाराष्ट्रात जो विरोध झाला, ज्या लढाया झाल्या त्याचं वर्णन औरंगजेबानं असं केलंय की, "शिवाजी मला अजून छळतोय" म्हणजेच त्याला पुढे लढण्याची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतो"
"अजूनही याच प्रेरणेवर महाराष्ट्र अजून उभा आहे. यामध्ये पेशवे जरी घेतले तरी ते त्याच प्रेरणेवरती आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा पाहिला तर तोही त्याच प्रेरणेवर आहे. अजूनही तीच प्रेरणा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. महाराष्ट्राचं नशिब की इतकी मोठी व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आली आणि त्यानं ती प्रेरणा संपूर्ण देशाला दिली" अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे.