
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनने आता वेगाने वाटचाल सुरू केली आहे.
मॉन्सून मराठवाड्यात दाखल; विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
पुणे - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनने आता वेगाने वाटचाल सुरू केली आहे. सोमवारी (ता.१३) मराठवाड्यात दाखल होत मॉन्सूनने जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. नंदूरबार, जळगाव, परभणी पर्यंतच्या भागात त्याने मजल मारली आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने बुधवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू व्यापून, विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १७) ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील मॉन्सून पोचण्याचे संकेत आहेत. सोमवारी कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडला, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनचे आगमन आणि पावसामुळे विदर्भातील कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस -
विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. हरियाणापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रासह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट -
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
Web Title: Monsoon In Marathwada Rain Weather
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..