मॉन्सूनने राज्य व्यापले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मुंबईसह संपूर्ण राज्य मंगळवारी व्यापले. यंदा राज्यात आगमन उशिराने होत 1972 नंतर उशिरा 20 जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करीत पाच दिवसांत राज्य व्यापले. मात्र, साधारणतः 15 जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा सर्व महाराष्ट्रात पोचण्यास दहा दिवस उशीर झाला.

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मुंबईसह संपूर्ण राज्य मंगळवारी व्यापले. यंदा राज्यात आगमन उशिराने होत 1972 नंतर उशिरा 20 जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करीत पाच दिवसांत राज्य व्यापले. मात्र, साधारणतः 15 जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा सर्व महाराष्ट्रात पोचण्यास दहा दिवस उशीर झाला.

राज्यात दाखल होताच मॉन्सूनने वेगाने वाटचाल केली. गुरुवारी (ता. 20) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा उत्तरेकडे मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. 23) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. सोमवारी (ता. 24) मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला, तर कोकणात वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करीत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सूनने मजल गाठली होती. मॉन्सूनने मंगळवारी दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांपर्यंतचा टप्पा पूर्ण केला.

यंदा सुरवातीपासूनच मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. 18 मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने आठवडाभरानंतर 30 मे रोजी थोडीशी चाल केली. मे रोजी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान व्यापून, अरबी समुद्राकडे वाटचाल केली. पाच जून रोजी श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला. तर, तब्बल आठवडाभर उशिराने आठ जून देवभूमी केरळात डेरेदाखल झाला. त्यानंतर 10 जून मॉन्सूनने केरळच्या बहुतांशी भागांत मजल मारली. याच दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र वायू चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. 14 जून रोजी दक्षिण कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंतचा पट्टा मॉन्सूनने पूर्ण केला होता.

महाराष्ट्रातील लांबलेले आगमन हे यंदाच्या मॉन्सूनचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. केरळमध्ये साधारणत: एक जूनपर्यंत पोचणारा मॉन्सून सात जूनपर्यंत तळ कोकणात, दहा जूनपर्यंत पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांशी भागांत पोचतो. तर, 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्य त्याच्या अधिपत्याखाली घेतो. या वर्षी वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. मॉन्सून 20 जून रोजी तळकोकणात पोचला, तर 25 जून रोजी राज्य व्यापले.

पुण्यात पावसाच्या सरींची शक्‍यता
शहर परिसरात दोन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते. संध्याकाळी शहराच्या मध्य वस्तीसह कोथरूड, लोहगाव, पाषाण येथे पावसाच्या दमदार सरी पडल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Rain Maharashtra