पावसाळी अधिवेशन ऑगस्टमध्ये उपराजधानीत होण्याची शक्‍यता!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

मुंबईत कोरोनाचे संकट पाहता यंदाचे अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होण्याची शक्‍यता आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळते.

नागपूर : कोरोनामुळे सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय घडामोडींवरही परिणाम होतो आहे. दरवर्षी जुलैमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन यंदा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यंदा हे अधिवेशन मुंबई येथे न होता उपराजधानी नागपूर येथे होणार असल्याचे कळते.
इतर सर्व व्यवहारांप्रमाणेच राजकीय व्यवहारांचेही वेळापत्रक कोरानाने बदलवले असून त्याचा परीणाम म्हणजे पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडणार आहे. यंदा अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार आहे. मुंबईत कोरोनाचे संकट पाहता यंदाचे अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होण्याची शक्‍यता आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळते.
गर्दी टाळण्यासाठी हे अधिवेशन अतिशय कमी कालावधीचे असणार आहे. एका आठवड्यात अधिवेशन गुंडाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. महत्त्वाचे कामकाज होती घेण्यात येणार असून अनेक चर्चा, प्रश्न, प्रस्ताव टाळण्यात येणार असल्याचे कळते. आर्थिक बाबींवर मात्र भर असणार असल्याचे कळते.
साधारणत: पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात घेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे मुंबईतील कामकाज ठप्प पडले आहे. इतक्‍या कमी वेळात अधिवेशनाची तयारी करणे अवघड आहे. मंत्रालय असल्याने नागरिकांची गर्दी असते. अधिवेशन काळात ती वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन इतरत्र म्हणजे नागपूरला घेण्याबाबतची चर्चा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली. परंतु यावर अंतिम निर्णय झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अधिवेशन एक महिना लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
पावसाळी अधिवेशन तिसऱ्यांदा नागपूरमध्ये
यापूर्वी दोन पावसाळी अधिवशने नागपुरला झालीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन वर्षापूर्वी पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले होते. हे अधिवेशन 4 जुलैला सुरू 20 जुलैला संपले. यात 13 बैठका झाल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे एक दिवस अधिवेशानाचे कामकाज बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यापूर्वी 1965 ला एकदा पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते. त्यावेळी जवळपास 17 बैठका झाल्या होत्या.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon session of Maharashtra government in Nagpur this year