Monsoon Update I पुढील २ दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, हवामान खात्याची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon Marathi News Updates

सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

पुढील २ दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार - IMD

यंदा 'असनी' चक्रीवादाळामुळे वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याची भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. (Monsoon News Updates)

दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत असून, महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊसधारा बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे १६ मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला.

पुढील दोन ते दिवस दिवस कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.

१७ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. मात्र, १८ मे रोजी त्यांनी उत्तर-पूर्व दिशेने बंगालच्या उपसागरात प्रगती केली. दक्षिणेच्या बाजूने मात्र त्यांनी अद्याप प्रगती केलेली नाही. मात्र, पोषक वातावरण असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मोसमी वारे सक्रिय होऊन आता अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रभाव वाढला असून, त्यामुळे काही भागांत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या तापमानाची दुहेरी स्थिती आहे. बहुतांश भागांत अद्यापही दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पाचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरणही निर्माण झाले आहे.