खासदार माढ्याचे अन्‌ रणजितसिंह नाइक निंबाळकरांचे प्रेम फलटण तालुक्यावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Ranjitsingh Naik Nimbalkar
खासदार माढ्याचे अन्‌ रणजितसिंह नाइक निंबाळकरांचे प्रेम फलटण तालुक्यावरच

खासदार माढ्याचे अन्‌ प्रेम फक्त फलटण तालुक्यावरच

सोलापूर : मोदी सरकारने खासदारांच्या मतदारसंघातील पाच गावांसाठी आदर्श संसद ग्राम योजना सुरु केली. सुरवातीला त्यासाठी निधीही मिळाला आणि खासदारांनी एक विकासाचे मॉडेल म्हणून दरवर्षी एक गाव निवडून त्याचा चेहरामोहरा बदलला. त्यात खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील दोन गावे निवडली. तर उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यंदा बार्शीतील सुर्डी गाव निवडले आहे. पण, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन वर्षांत एकदाही माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील गाव निवडले नाही. त्यामुळे ‘खासदार माढ्याचे अन्‌ प्रेम फक्त फलटण तालुक्यावरच’ अशी चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

खासदारकीच्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. माढा लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखड्यात उतरलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे यांचा पराभव केला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर विजयी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श संसद ग्राम योजनेतून खासदारांनी निवडलेल्या गांवाचा चेहरामोहरा बदलला. खासदारांनी या योजनेअंतर्गत त्यांना निवडणुकीत साथ देणाऱ्या तालुक्यातील गाव निवडले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला बार्शी तालुका जोडला गेला आहे. मतदारांची उतराई म्हणून ओमराजे यांनी बार्शीतील सुर्डी गाव दत्तक घेऊन त्याठिकाणी निधी दिला. सोलापूरचे खासदार डॉ. महास्वामी यांनीही योजनेतून निवडलेल्या दोन्ही गावांना निधी दिला. पण, माढ्याचे खासदार नाईक-निंबाळकरांना माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला या तालुक्यातील एकही गाव निवडता आले नाही हे विशेष.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

मोदी लाटेत भाजपकडून लॉटरी
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील मोदी लाटेत अनेकांना आमदार, खासदारकीची लॉटरी लागली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय सुकर झाला. पण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री झाल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघात फारसा वेळ देता आला नाही. तर माढ्यातील मतदारांनाही बदल हवा होता. त्यामुळेच भाजपच्या नवख्या उमेदवारांना लाखोंच्या मताधिक्यांने विजय मिळाला, असेही बोलले जात आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

पुढील उमेदवारीची वाट खडतरच?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे मोदी लाटेत खासदार झालेले ॲड. शरद बनसोडे हे पक्षाने केलेल्या सर्व्हेत नापास झाले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी डॉ. महास्वामींना संधी मिळाली. आता पक्षाच्या सर्व्हेत डॉ. महास्वामी नापास झाल्याची चर्चा असून त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद न्यायालयात आहे. तर माढ्याच्या खासदारांबद्दलही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे त्यांची पुढच्या लोकसभेची उमेदवारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशावरच अवलंबून असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विरोधकांनीही आता त्याठिकाणी तगड्या उमेदवाराचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Mp Ranjit Singh Naik Nimbalkars Love Is For Phaltan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top