
मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस लावणा-यांच्या पाठीशी राहू असे ठणकावून सांगा अशी सूचना मराठा समाजाला खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (रविवार) येथे केली.
सातारा : मराठा आरक्षणावर काेणाही बाेलायला तयार नाही. राजकारणातील ज्येष्ठ नेतेमंडळींनी मराठा आरक्षणावर भूमिका का मांडली नाही. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी 1989 कालावधीत मंडल आयाेगाच्या शिफारशी अंमलात आणल्या. मग, त्याच वेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही असा प्रश्न खासदार उदयनराजे भाेसले यांनी उपस्थित केला.
येथील जलमंदिर पॅलेस येथे आज (रविवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी पत्रकार परिषद बाेलावली आहे. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. मराठा आरक्षणात राजकारण केले जात असल्याने ते प्रत्यक्षात लागू हाेण्यात अडचणी येत आहेत. आरक्षण दिले नाही तर मराठा समाजात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक माेठी मंडळी येऊन गेली. त्यांनी या विषयावर गेल्या 25 वर्षांत आवाज का उठवला नाही, असा प्रश्न आमची पिढी विचारत असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.