esakal | MPSCच्या 'त्या' परीक्षेचा चेंडू आपत्ती व्यवस्थापनाच्या कोर्टात, वडेट्टीवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSCच्या 'त्या' परीक्षेचा चेंडू आपत्ती व्यवस्थापनाच्या कोर्टात

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात एमपीएससीची (MPSC exams) परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. त्यातूनच रखडलेल्या सर्व २४ परीक्षा घेण्यासाठी आयोगाने विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar) यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्र पाठवून परीक्षा घेण्याची परवानगी मागविली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठविले. (mpsc seek permission to minister vijay wadettiwar for conduct of 24 exams)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध २४ परीक्षा रखडलेल्या आहेत. यामध्ये अभियांत्रिकी सेवा, शारीरिक चाचणी, न्यायिक सेवा, राज्यसेवा, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इतर परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय ४१३ अधिकाऱ्यांचा भरतीचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे लाखो तरुण चिंतेत सापडले आहेत. यामुळे आयोगाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. यातूनच एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात दिसून आले. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एसपीएससीवर ३१ जुलैपर्यंत सदस्य नेमण्याची घोषणा केली. याशिवाय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या चौकशीची मागणी केली. यामुळे एमपीएससीचे अधिकाऱ्यांना जाग आली. त्यातूनच आज आयोगाने तत्काळ पत्र विजय वडेट्टीवार यांच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याला संयुक्त परीक्षा घेण्याची परवानगी मागितली आहे. आता त्याबाबत विजय वडेट्टीवार यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्णय घ्यायचा आहे.

१० जुलैपर्यंत निर्णय घ्यावा -

राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षेसाठी जवळपास पाच लाख विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. आधीच परीक्षा दोन वर्षांपासून रखडल्या असल्याने त्याबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होत असल्याचे दिसून येत आहे. आता त्यास उशीर झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आणखी रोष वाढणार असून याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने १० जुलैच्या आत निर्णय घ्यावा अशी मागणी स्टुडन्ट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांनी केली आहे.

loading image