शिवसेनेच्या फुटी मागच्या कारणांचा लवकरच गौप्यस्फोट करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anandrao Adsul

Anandrao Adsul : शिवसेनेच्या फुटी मागच्या कारणांचा लवकरच गौप्यस्फोट करणार

मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार यांनी सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुंबईत शिंदे गटाला पाठिंबा देण्यामागची कारणमीमांसा केली. सोमवारी को-ऑपरेटिव बैंक एम्प्लॉईज युनियन मुंबईच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे दादर परिसरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका परत एकदा अडसुळानी स्पष्ट केली .तसेच शिवसेनेच्या फुटीमागे नेमकी कारणे काय या बाबत लवकर गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आनंदराव अडसूळ म्हणाले गेल्या ५६ वर्ष एक संघ कार्यरत असलेल्या शिवसेनेमध्ये दुफळी झाली किंबहुना त्याला बंड आणि क्रांती असे नाव दिल्यास वावगे ठरणार नाही. मागच्या अडीच वर्षांमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते, एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर असताना, आवश्यक ते कार्यक्रम घेणे, महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरणे, येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तींना भेट देणे हे आवश्यक होते.

मुख्यमंत्री म्हणून केवळ कोरोनाचे कारण सांगून घरातून ऑनलाईन व्यवहार करणे योग्य नसल्याचे म्हणत अडसुळानी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महविकास आघाडी सरकारच्या काळात निधीवाटपावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वात कमी केवळ १६ टक्के शिवसेनेच्या वाट्याला आला असल्याचा अडसुळानी आरोप केला . शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, ही फार मोठी तफावत होतीच पण त्याशिवाय बऱ्याच वेळा हा अनुभव आला की, शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीचा पडलेला उमेदवार, त्याला मात्र निधी मिळत होता आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी त्या मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन करीत होते. ह्या सगळ्यातून संबंधित असलेले आमदार नाराज झाल्याचा अडसुळानी दावा केला आहे.