Andheri Bye Election: भाजप उमेदवाराच्या विरोधात ठाकरे गट आक्षेप घेण्याच्या तयारीत; ही आहेत कारणं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri Bye Election

Andheri By Election: भाजप उमेदवाराच्या विरोधात ठाकरे गट आक्षेप घेण्याच्या तयारीत...

Andheri, Mumbai : रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात ठाकरे गटाने आक्षेप नोंदवण्याची तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलेलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं असून ढाल-तलवार हे चिन्ह मिळालंय.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये मुख्य लढत ही भाजप आणि ठाकरे गटामध्ये होतेय. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आहेत. तर शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल हे आहेत. मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक हे रितसर आक्षेप घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मुरजी पटेल यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. शिवाय खोटं जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केल्याने त्यांचं नगरसेवक पदही रद्द झालेलं आहे. याच मुद्द्यांच्या आधारे संदीप नाईक आक्षेप दाखल करणार असल्याचं समजतं. आक्षेप दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजातर्फे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वार बोर्डाचे रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतंजुळतं असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वार बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसेच हे निवदेन त्यांनी निवडणूक आयोगालाही पाठवलं आहे.