यंदा पावसाचा दररोज अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

मॉन्सूनपूर्व बैठकीत सर्व यंत्रणांचा आढावा
मुंबई - यंदाचा मॉन्सून सरासरी इतका होणार असल्याची माहिती देत, दररोज पावसाचा अंदाज देण्याची पद्धत या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यास हवामान विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत हवामान विभागाकडून आठ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला जात होता.

मॉन्सूनपूर्व बैठकीत सर्व यंत्रणांचा आढावा
मुंबई - यंदाचा मॉन्सून सरासरी इतका होणार असल्याची माहिती देत, दररोज पावसाचा अंदाज देण्याची पद्धत या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यास हवामान विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत हवामान विभागाकडून आठ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला जात होता.

मात्र, आता दररोज अंदाज व्यक्‍त करून सर्व यंत्रणांना पूर्वसूचना देण्याची तयारी असल्याचे हवामान विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले.

आगामी पावसाळ्यात सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी मॉन्सूनपूर्व आराखड्याची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना दिले.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीन तासांची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक आज "सह्याद्री' अतिथिगृहात पार पडली. या वेळी महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव यांच्यासह मदत व पुनर्वसन गृहनिर्माण विभाग, गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, "एमएमआरडीए'चे आयुक्त, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नौदल, लष्कर आणि तटरक्षक दलाचे अधिकारीही उपस्थित होते.

विविध विभागांनी केलेल्या मॉन्सूनपूर्व तयारी आराखड्यांबाबत समाधान व्यक्त करून फडणवीस म्हणाले, की सर्वांचे आराखडे योग्य आहेत. मात्र, या आराखड्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर उत्तमरित्या होईल याकडे लक्ष द्यावे. भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज अचूकपणे वर्तविल्याचे आजपर्यंत दिसून येत आहे. या वर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. सर्व विभागांनी आगामी पावसाच्या नियमित अंदाजानुसार तातडीच्या उपाययोजनांचे नियोजन करावे. रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गांचा, दळणवळण यंत्रणेचा प्रभावीपणे उपयोग करावा. सर्व विभागांसह "एनडीआरएफ', रेल्वे, नौदल आणि लष्कराने उपाययोजनांचे सादरीकरण केले.

खड्डे लगेच भरणार
यंदा मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना केल्याची माहिती महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी दिली. एकतर मुंबईतल्या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असून, खड्डा पडलाच तर त्याच क्षणी तो भरण्याची यंत्रणा सज्ज असल्याचे सादरीकरण मेहता यांनी केले.

सर्वांचे आराखडे योग्य आहेत. मात्र, या आराखड्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर उत्तमरित्या होईल याकडे लक्ष द्यावे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra daily rain information by weather department