भिवंडीत कॉंग्रेस; पनवेलमध्ये भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 मे 2017

महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा

महापालिका निवडणुकांमध्ये मालेगावात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा
मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पनवेलमध्ये मात्र भाजपने बाजी मारली असून, तेथे केवळ दोन जागा मिळवणाऱ्या कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.

राज्यातील मालेगाव, भिवंडी व पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.

या तिन्ही महापालिकांच्या एकूण 252 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 79 जागा पटकावत पहिला क्रमांक कायम ठेवला, तर कॉंग्रेसने 77 जागा जिंकत भाजप व इतर पक्षांना अचंबित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 22 जागा मिळाल्या असून, त्यात मालेगावच्या 20 जागांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर पनवेलमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला मात्र तीनही महापालिकांत पराभवाचा सामना करावा लागला.

अल्पसंख्याकबहुल भिवंडी व मालेगाव महानगरपालिका निवडणुकांत मतदारांनी कॉंग्रेसला झुकते माप दिल्याने राज्यातील नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांपैकी कॉंग्रेसने सर्वाधिक 47 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले, तर भाजपने 19 जागा जिंकत मुसंडी मारली आहे. शिवसेनेला बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. मालेगावमध्ये 84 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा कॉंग्रेसने, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 20 जागा, तर शिवसेनेने 13 जागा जिंकल्या आहेत. भाजपने नऊ जागा जिंकल्या आहेत. "एमआयएम'ला सात जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मालेगावचा महापौर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा होणार की, कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस "एमआयएम', जनता दलाची मदत घेणार याची उत्सुकता लागली आहे.

पनवेलमध्ये भाजपने 78 जागापैकी सर्वाधिक 51 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. शेतकरी कामगार पक्षाला केवळ 23 जागा मिळाल्या आहेत. या तीन महापालिकांच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या पाहता, भाजप 79 जागांसह पहिल्या, कॉंग्रेस 77 जागांसह दुसऱ्या आणि शिवसेना 25 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पालिकानिहाय चित्र असे -
- भिवंडी-निजामपूर - एकूण जागा 90 - कॉंग्रेस-47, भाजप-19, शिवसेना-12, राष्ट्रवादी कॉंग्रेस-0
- मालेगाव - एकूण जागा - 84 - कॉंग्रेस-28, राष्ट्रवादी कॉंग्रेस-20, शिवसेना-13, भाजप-9, "एमआयएम'-7, जनता दल-6
- पनवेल - एकूण जागा - 78 - भाजप- 51, शेतकरी कामगार पक्ष-23, कॉंग्रेस-2, राष्ट्रवादी कॉंग्रेस-2, शिवसेना-0

राज्यनिहाय चित्र असे  (एकूण जागा व पक्ष)
- एकूण जागा : 252
- भाजप : 79
- कॉंग्रेस : 77
- शिवसेना : 25
- राष्ट्रवादी कॉंग्रेस : 22
- शेकाप : 23
- "एमआयएम' : 07
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) : 06
- रिपब्लिकन पक्ष : 04
- समाजवादी पक्ष : 02
- अपक्ष : 03
- कोणार्क आघाडी : 04

महापालिका निकाल
मालेगाव : 84 जागा
कॉंग्रेस : 28
राष्ट्रवादी : 20
शिवसेना : 13
भाजप : 09
एमआयएम : 07
जनता दल : 06
अपक्ष : 01

राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल युती एकत्रित 26 जागा + 1 पुरस्कृत
पनवेल : 78 जागा
भाजप : 51
शेकाप : 23
कॉंग्रेस : 02
राष्ट्रवादी : 02
शिवसेना/स्वाभिमानी : 00
मनसे : 00

शेकाप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडी
भिवंडी : 90 जागा
कॉंग्रेस : 47
भाजप : 19
शिवसेना : 12
अपक्ष/इतर : 10
समाजवादी पक्ष : 02
राष्ट्रवादी : 00

मालेगावात भाजपचा प्रयोग फसला
देशभरात गाजत असलेल्या तीन तलाकच्या मुद्याच्या पार्श्‍वभूमीवर मालेगावात भाजपने एकूण 55 जागा लढविल्या. त्यामध्ये 29 उमेदवारांना त्यातही 16 मुस्लिम महिला उमेदवारांना त्यांनी रिंगणात उतरविले होते. दुसरीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अपूर्व हिरे, युवा नेते अद्वय हिरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, डॉ. नदीम शेख अशा बड्या नेत्यांची फौज पक्षाच्या विजयासाठी भाजपने कामाला लावली होती. मात्र पूर्व भागात भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी न झाल्याने तीन तलाकच्या मुद्यावर मुस्लिम मते मिळविण्याचा हा प्रयोग फसला. भाजपच्या बहुसंख्य उमेदवारांना 500 मतांचाही पल्लाही गाठता आला नाही.

दादा भुसेंकडून हिशेब चुकता
शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा कॅम्प-संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत व भायगाव परिसरातील करिश्‍मा निकालातून दिसला. शिवसेनेने फक्त 26 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात दोन जागांची भर पडली आहे. भाजपला रोखत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाची भुसे यांनी महापालिकेत परतफेड केली. मात्र भुसे यांचे शालक जयराज बच्छाव व शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने यांना पराभव पत्करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news bhivandi congress & panvel bjp win