'मुदतपूर्व'साठी भाजपाची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 जून 2017

दानवे; अमित शहा मातोश्रीवर जाणार

दानवे; अमित शहा मातोश्रीवर जाणार
मुंबई - राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता नाही. मात्र त्या झाल्याच तर भाजपाची त्यास तयारी असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी येथे केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारपासून (ता.16) तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी मुंबईत मंत्रालयाजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी दानवे बोलत होते.

या दौऱ्यात शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर जाऊन भेट घेणार असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेची जागा कालपासून मुदतपूर्व निवडणुकीने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे, अशा आशयाचे विधान केले. याबाबत विचारले असता दानवे म्हणाले की "मला वाटत नाही, मुदतपूर्व निवडणुका होतील. मात्र झाल्याच तर भाजपची तयारी आहे'. यावेळी दानवे यांनी शहा यांच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तसेच या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहा 16 ते18 जून या कालावधीत राज्यात येणार आहेत. बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांशी भेटून चर्चा करणार आहेत. संघटनात्मक पातळीवर कामाचा, पक्ष विस्ताराचा तसेच सरकारी पातळीवर विकास कामांचा आढावा ते घेणार आहेत. याचबरोबर ते पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामांचे मूल्यांकन करणार आहेत. तसेच मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक तपासणार आहेत. यानंतर मुंबईतील काही नागरिक, कलाकार, व्यावसायिक, पत्रकार आदी क्षेत्रांतील जाणकारांशी ते संवाद साधणार आहेत.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच यंदा पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांत भाजपची विस्तार योजना आहे. यामध्ये अध्यक्ष शहा देशभरात 110 दिवस देशव्यापी दौरा करणार आहेत.

निमत्रंणावरुन शहा यांची "मातोश्री' भेट
अमित शहा मुंबई भेटीत "मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? असा सवाल केला असता दानवे म्हणाले की शहा हे "मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. याबाबत अधिक स्पष्टीकरण करताना ते म्हणाले की "एनडीए'मधील सर्व घटक पक्षांना शहा भेटत असतात. यापूर्वी शहा यांनी "एनडीए'मधील सर्व पक्षांच्या प्रमुखांना दिल्लीत निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण ठाकरे यांनी स्वीकारले होते. त्यावेळी ठाकरे यांनी मुंबईत आल्यावर "मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण शहा यांना दिले होते. त्याला अनुसरून ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news bjp preparation for election