माजी मंत्री सुबोध मोहिते यांचा कॉंग्रेसला रामराम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 मे 2017

मेटे यांच्या "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश; "गाव तिथं शिवसंग्राम'चा नारा

मेटे यांच्या "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश; "गाव तिथं शिवसंग्राम'चा नारा
मुंबई - माजी केंद्रीय राज्यमंत्री व दोन वेळा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुबोध मोहिते यांनी आज विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद या नव्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहिते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

"गाव तिथे शिवसंग्राम' अशी घोषणा करीत सुबोध मोहिते यांनी सहा महिन्यात शिसंग्रामच्या संघठनेला मजबूत करण्यास प्राधान्य देणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. मोहिते हे शिवसेनेचे दोन वेळा खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय राज्य मंत्री म्हणून मोहिते यांनी काम केले आहे. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ते कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. मात्र क्षमता, पात्रता व अजेंडा असतानाही कॉंग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली जात नाही. यामुळे राजकाणातली सहा वर्षे वाया गेल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला.

सध्या देशभरात भाजपमध्ये प्रवेश करण्याची स्पर्धा सुरू असतानाही सुबोध मोहिते यांनी राष्ट्रीय पक्ष सोडून "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश केल्याने बळ मिळेल, असा विश्वास आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केला.
शिवसंग्राम प्रणीत भारतीय संग्राम परिषद हा पूर्णपणे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून सर्व निवडणुकांत उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

नागपूरात मेळावा
सुबोध मोहिते यांनी सेमवारी "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही या पक्षात प्रवेश केला. आता 9 जून रोजी नागपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी मोहिते यांचे अनेक समर्थक व पदाधिकारी "शिवसंग्राम'मध्ये प्रवेश करणार असल्याचे विनायक मेटे यांनी जाहीर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news subodh mohite resign to congress