शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 August 2017

आमदारांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा

आमदारांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोढणे गळ्यात न बांधता एकहाती सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नाराज आमदारांना "गाजर' दाखविण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर त्यांचे आमदार नाराज असल्याने मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अशा शिवसेना आमदारांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे.

विधान परिषदेवर निवडून आलेल्यांना मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत सुरवातीपासूनच नाराजी होती. त्यातच हे मंत्री आमदार व पदाधिकाऱ्यांची कामे करत नसल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. या शिवसेना आमदारांची नाराजी मुख्यमंत्र्यांनी हेरली आहे. शिवसेनेचा नाराज आमदार खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील आमदार आल्यास त्याचे काम तत्काळ करून देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. 'शिवसेनेचे मंत्री काही कामाचे नाहीत. अगदी सोपे काम होते. अनेक महिन्यांपासून मंत्री इकडून तिकडे नाचवत होते. पण मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावर पटकन काम झाले'', असे मराठवाड्यातील शिवसेनेच्या एका तरुण आमदाराने सांगितले.

मुख्यमंत्र्यांची ही कार्यतत्परता म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचे मानले जाते. एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न अवघे 23 आमदार कमी पडले म्हणून भंगले. त्यामुळे स्थिर सरकारसाठी शिवसेनेला बरोबर घ्यावे लागले. मात्र शिवसेनेला सोबत घेतल्याने भाजपला त्रासच जास्त झाला. आगामी विधानसभा निवडणूक एकहाती जिंकायची असेल, तर सर्वांत मोठा शत्रू असलेल्या शिवसेनेला तडाखा देण्याखेरीज पर्याय नाही, असे भाजपच्या नेतृत्वाने हेरले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची कामे करून त्यांना उपकृत करायचे आणि आयत्या वेळी भाजपमध्ये प्रवेश द्यायचा, असे भाजपचे मनसुबे असल्याचे सांगण्यात येते.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा लक्ष्य
शिवसेनेच्या 63 पैकी 22 आमदार उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून निवडून आले आहेत. शिवसेनेला सत्तेत बसायचे असल्यास याच भागात ताकद वाढविण्याची गरज आहे. या भागातील आमदारांची संख्या वाढल्यास शिवसेनेला सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र मुंबईतील मंत्र्यांनी याच भागातील आमदारांची नाराजी ओढवून घेतली आहे. ही नाराजी आगामी विधानसभेत शिवसेनेला महागात पडू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra politics by chief minister