Mumbai News: विनापरवाना धंदा अन् किचन अस्वच्छ ठेवणाऱ्या व्यासायिकांना दणका; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या आणि स्वयंपाक घरात स्वच्छता न ठेवणाऱ्या मुंबईतील १५ हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली आहे. एफडीएने या हॉटेल्सना ‘स्टॉप वर्क’ ऑर्डरही दिली आहे.

हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये मृत उंदीर आढळल्यानंतर एफडीएने ऑगस्टपासून मुंबईतील १३ विभागांमध्ये हॉटेल्सची तपासणी सुरू केली. आतापर्यंत एकूण १५१ हॉटेल्सची तपासणी झाली असून त्यापैकी १३७ हॉटेल्सना सुधारणा करण्याची नोटीस बजावून त्यांच्याकडून एक लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण हॉटेलच्या जेवणावर अवलंबून असतात. नागरिक हॉटेलमध्ये जाऊन किंवा घरी तसेच कार्यालयात पार्सल जेवण मागवतात. जेवणाची चव, आकर्षक पॅकेजिंग किंवा हॉटेल बघून नागरिक जेवणाची ऑर्डर देतात; परंतु ज्या ठिकाणी जेवण बनवले जाते, त्या स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते.

गेल्या महिन्यातच एफडीएने शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलची पाहणी केली असता किचनमध्ये उंदीर, किडे आदींचा मुक्त वावर आढळला. त्यातच त्यासोबत हॉटेलचा परवानाही संपला होता. त्यामुळे कारवाईचा फास आवळत एफडीएने तात्काळ हे हॉटेल बंद करण्याचे आदेश जारी केले.

शहरात बाहेरचे चटपटीत खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. स्वच्छतेचा विचार केला तरी यात मुंबईतील हॉटेल्समध्ये अस्वच्छता आढळते. मुंबईत अशी शेकडो हॉटेल्स आहेत, त्यात एफडीएने आतापर्यंत १५१ हॉटेल्सची तपासणी केली असून त्यापैकी ९१ टक्के हॉटेल्सना सुधारणा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

यासोबतच ‘आहार’ आणि एफडीएसह हॉटेल असोसिएशनही हॉटेल व्यावसायिकांना जागरूक करण्यासाठी कार्यशाळा घेतात. असे असतानाही नियम आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जाते. तज्ज्ञांच्या मते एफडीएने कठोर कारवाई करायला हवी; मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आवश्यक त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे.

बहुतांश हॉटेल असक्षम!

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे चेकलिस्ट आहे. त्याच आधारावर आम्ही हॉटेल्सची तपासणी करतो. बहुतेक हॉटेल्स निर्धारित मानकांचे पालन करण्यास सक्षम नाहीत. अनेक वेळा आम्ही हॉटेल्सना नोटीस देतो आणि त्यांना सुधारणा करण्यास सांगतो.

काही कमतरता असतील तर त्याही दूर करण्यास सांगतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये हॉटेलांना दंडही ठोठावण्यात आला आहे. आम्हाला कोणतीही मोठी चूक आढळल्यास आम्ही त्वरित काम थांबवण्याची सूचना जारी करतो, असे एका एफडीए अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.

काय दोष आढळले?

१) तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये स्वच्छतेचा अभाव होता. नियमानुसार डस्टबिनला झाकण आवश्यक असताना अनेक ठिकाणी ते उघडे आढळले. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात ग्लोव्हज आणि डोक्यावर टोप्या घालाव्या लागतात. या दोन्ही गोष्टींसोबतच शेफला ॲप्रॉन घालावे लागते; परंतु अनेक हॉटेल्सने वरील नियम पाळला नसल्याचे तपासात समोर आले आहे.

२) हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि फिटनेस सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक आहे. यावरून कर्मचाऱ्यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराची बाधा नसल्याचे स्पष्ट होते. तपासादरम्यान अनेक हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्रे आढळून आली नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com