डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

...त्यांना लगेचच कर्जमाफी
पाच एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी दिली जाईल. त्याचे परिपत्रक संध्याकाळपर्यंत काढले जाईल, असे सागून महसूलमंत्री म्हणाले, 'सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या भावना आणि त्यांचे म्हणणेही विचारात घेणार आहोत; तसेच विरोधी पक्षनेत्यांची समिती बनवणार असून, ही समिती कर्जमाफीसाठीचे निकष ठरवेल. त्या निकषांप्रमाणे कर्जमाफी दिली जाणार आहे.

मुंबई - 'कर्जमाफी झाली ती आमच्यामुळेच' असे शिवसेनेचे नेते वारंवार ओरडून, पोस्टर लावून सांगत असले तरी भाजपने मात्र त्यांना किरकोळीत काढले आहे. कर्जमाफी झाली नसती तर भूकंप झाला असता, असे दावे करणाऱ्या शिवसेनेला "डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतो' असे उत्तर भाजपकडून देण्यात आले.

कर्जमाफीच्या बाबतीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री रामदास कदम हे "आमच्यामुळेच...'चा नारा बुलंद करत असताना दुसरीकडे भाजप नेत्यांकडून केले जाणारे वक्तव्य म्हणजे "त्यांना त्यांची जागा' दाखवण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. कर्जमाफीच्या मुद्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याच्या वक्तव्यामुळे कोंडी झाली होती ती शिवसेनेचीच, असाही भाजपचा दावा आहे. कर्जमाफीमुळे कातडी बचावल्याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी दंड थोपटणे म्हणजे "गिरे तो भी टांग उपर' असा प्रकार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

शिवसेनेने भीती दाखवली म्हणून सरकारने कर्जमाफी दिलेली नाही. सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती, म्हणूनच आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सरकार कुणाच्या धमक्‍यांमुळे निर्णय घेत नाही, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला; तर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शिवसेनेला वेगळीच उपमा दिली. बापट म्हणाले, की निसर्ग नियमानुसार सूर्य उगवणारच असतो; मात्र तो आमच्यामुळेच उगवला, असे काहींना वाटते. तशीच अवस्था शिवसेनेची झाली आहे.
दुसरीकडे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी तर शिवसेनेच्या दाव्यांना अगदीच किरकोळीत काढलेले दिसते. कर्जमाफी न झाल्यास भूकंप होईल, असा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना "डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही,' असे वक्तव्य हाके यांनी केले आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केल्याचे वृत्त पसरले. या मागणीत काहीही नवे नसल्याचे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले. कर्जमाफीच्या प्रक्रियेला उशीर लागणार असल्याने 10 हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीतच घेण्यात आला होता. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी मुख्यमंत्र्यांना त्या निर्णयाची केवळ आठवण करून दिली, असे पाटील म्हणाले.

...त्यांना लगेचच कर्जमाफी
पाच एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी दिली जाईल. त्याचे परिपत्रक संध्याकाळपर्यंत काढले जाईल, असे सागून महसूलमंत्री म्हणाले, 'सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या भावना आणि त्यांचे म्हणणेही विचारात घेणार आहोत; तसेच विरोधी पक्षनेत्यांची समिती बनवणार असून, ही समिती कर्जमाफीसाठीचे निकष ठरवेल. त्या निकषांप्रमाणे कर्जमाफी दिली जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जर पीककर्ज घेऊन "एफडी' इतर बॅंकांत केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. तरीही सर्वानुमते आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करूनच निकष ठरवले जातील.'' ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, त्यांनी ती न घेण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news strong response from the BJP