युतीचा धनुष्य मोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. फक्त भाजपवर आरोपांचे बाण सोडत भाजपविरोधातील संघर्षाला तयार राहाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाणार असल्याची चर्चा आहे. 

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. फक्त भाजपवर आरोपांचे बाण सोडत भाजपविरोधातील संघर्षाला तयार राहाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाणार असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी (ता.30) दादरच्या शिवाजी पार्कला होणार आहे. युती तोडण्याची मागणी आमदारांनीच केल्याने भाजप आणि शिवसेनेतील संघर्षाला अधिकच धार आली आहे; मात्र युती तोडली तर राज्यातील सरकार पडणे शक्‍य नसल्याने आणि मराठवाड्यातील आमदारांनी ग्रामीण भागातील परीस्थीती लक्षात आणून दिल्याने उध्दव ठाकरे सध्यातरी सत्तेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत नाही. सत्तेतून बाहेर न पडता फक्त निवडणुकीच्या तयारीला लागा, मी योग्य वेळी निर्णय घेईन असे सुतोवाच उद्धव करण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने सरकारला 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदतही दसऱ्याच्या दिवशीच संपणार असल्याने हा मुद्दा मेळाव्यात गाजणार आहे. 

सत्तेतून बाहेर न पडता भाजपला मंत्रालयापासून रस्त्यावरही कोंडीत पकडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.  पुढील दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. याकाळात भाजपला सर्वच पातळ्यावर जेरीस आणण्याचे आदेश उध्दव ठाकरे देण्याची शक्‍यता आहे. महागाईवरुन शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. यात पहिल्यांदाच रस्त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दीक टिका करण्यात आली. शनिवारी झालेल्या एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर केईएम रुग्णालयात धाव घेत उद्धव ठाकरेंनी घटनेची माहीती घेतली. याचेही पडसाद दसरा मेळाव्यात उमटणार आहे. शिवाजी पार्क येथे संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा होईल.

दसरा मेळाव्याची तयारी
दादर - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी शुक्रवारी (ता. २९) शिवतीर्थावर सुरू होती. मेळाव्यानिमित्त दादरमध्ये सर्वत्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे फलक लावण्यात आले आहेत.  दसरा मेळाव्यासाठी मुंबई तसेच महाराष्ट्रातून शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर हजेरी लावतात. शिवतीर्थावर शनिवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याची पाहणी माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी केली. शिवसेनेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी; तसेच दसरा मेळावा सुरळीत पार पडावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news yuti issue dasara campaign