Mumbai : पोलीस भरती चाचणीनंतर अंघोळ करताना झाली उलटी अन्...; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना | Mumbai : Vomited while taking bath after police recruitment test and he died | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment

Mumbai : पोलीस भरती चाचणीनंतर अंघोळ करताना झाली उलटी अन्...; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना

मुंबई : पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवाराच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमर अशोक सोलके(२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. तो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आला होता. तो सध्या फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सोलकेने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लागोपाठ दुसरा मृत्यू

या आठवड्यात भरती प्रक्रिये दरम्यान घडलेली दुसरी घटना आहे. या पूर्वी मुंबई पोलीस दलातील भरतीची प्रक्रिये दरम्यान सांताक्रुझच्या कलिना येथील कोळे कल्याण मैदानात एका उमेदवाराचा 17 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीदरम्यान चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. गणेश उगले असे या तरूणाचे नाव असून 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली असता तो खाली कोसळला. यानंतर गणेश उगलेला सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत गणेश उगले 27 वर्षाचा असून मूळचा वाशिमचा आहे.

टॅग्स :Mumbai News