Vidhan Sabha 2019 : इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

कृष्ण जोशी
Saturday, 28 September 2019

चर्चगेट ते दहिसरपर्यंत मुंबईतील पश्‍चिम उपनगरांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. युती फिस्कटल्यास मित्रपक्षांवरही ‘वार’ करण्याची तयारी अनेकांची आहे; मात्र युती झालीच तर उमेदवारी न मिळालेले कोणावर ‘नाराजी’चा सूड उगवतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल. 

विधानसभा 2019

२०१४ च्या निवडणुकीत आपापली ‘शक्तिस्थळे’ आणि ‘मर्मस्थळे’ कळल्याने सर्वांनाच वास्तवाचे भान आलंय. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने आधीच आघाडीचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजपही युतीच्या मार्गावर आहे. अशातच भाजपमधील काही नेते एकमेकांचा पत्ता कापण्याची संधी शोधताहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेतेही याच संधीच्या शोधात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अस्तित्वासाठी एकदिलाने प्रचारही केला जाईल; मात्र २०१४ च्या निवडणुकांपासून एकमेकांना संपवू पाहणारे शिवसेना-भाजपमधील ‘अतृप्त’ नेते किती प्रामाणिकपणे एकमेकांना साथ देतील, युती झाल्यास एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी बंडखोरी की शत्रुपक्षाच्या उमेदवाराला ‘अदृश्‍य ताकदीचा’ प्रयत्न होईल, हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल. 

दहिसर मतदारसंघात मनीषा चौधरी आणि विनोद घोसाळकर, मागठाण्यात प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर, गोरेगावात सुभाष देसाई आणि विद्या ठाकूर हे दिग्गज आपापले सेनासागर घेऊन सज्ज आहेत. एकीकडे भाजप काही विद्यमानांचे पत्ते कापण्याच्या बेतात असताना शिवसेना मात्र ‘सेफ गेम’ खेळून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वगळता इतर ठिकाणचे आमदार कायम ठेवेल, असे दिसते. आदित्य ठाकरेंसह विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि खुद्द महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वरही संधीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहित भारतीय (कंबोज) मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. वर्सोव्यातून भाजपचे दोघे-तिघे इच्छुक आहेत. गोरेगावातूनही भाजपतर्फे कोण, हे गुलदस्तात आहे. भाजपवासी झालेले कांदिवलीतील ठाकूर कुटुंबीय आणि राजहंस सिंह विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी तयार आहेत. अर्थात, ठाकूर यांना अतुल भातखळकर यांच्या कांदिवलीतून संधीची शक्‍यता धूसर आहे; मात्र युती होवो न होवो, राजहंस यांच्यापुढे चांदिवलीसारखे पर्याय आहेत.

एकीकडे मलबार हिल, कुलाबा, जोगेश्‍वरी, वरळी, शिवडी, कांदिवली, चारकोप, बोरिवली अशा मतदारसंघांत युती झाल्यास किंवा न झाल्यास फारसा फरक पडणारही नाही. येथे मंगलप्रभात लोढा, रवींद्र वायकर, अजय चौधरी, अतुल भातखळकर, विनोद तावडे या शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड मानले जाते. युती झाल्यास मालाड, चांदिवली आणि मुंबादेवी येथे चुरशीच्या लढती होऊ शकतील. त्यामुळे येथून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. 

मुंबादेवीत मागील निवडणुकीतील भाजप आणि शिवसेनेची एकत्रित मते ही विजयी उमेदवार काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्यापेक्षा सहा हजारांनी अधिक आहेत. त्यामुळे येथे युती झाल्यास त्यांना पुन्हा विजयाची संधी असली, तरी यंदा काँग्रेस व ‘एमआयएम’च्या मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास पुन्हा चुरशीची लढत होईल.

अस्लम शेख नेमके कुठे? 
मालाडमधील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा आहे; मात्र ते नेमके कोणत्या पक्षात जातील, हे स्पष्ट नाही. त्यांना गत निवडणुकीत ५६ हजार मते मिळाली; मात्र त्या वेळी शिवसेना, भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश केलेले ‘मनसे’चे नेते दीपक पवार या सर्वांच्या मतांची बेरीज ८६ हजारांवर जात होती. त्यामुळे युती झाली आणि शेख काँग्रेसच्याच ‘हाता’शी राहिले, तर युतीला संधी मिळू शकते. चांदिवलीतही युतीच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.

ठाकरे कुटुंब प्रथमच रणांगणात!
आदित्य यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्य इतिहासात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, ते कोठून लढणार, तेथील आमदाराचे पुनर्वसन कसे होणार, विकासाची कोणती आश्‍वासने देणार, या प्रश्‍नांची उत्तरेही लवकरच मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai western Assembly election