'माझे कुटुंब माझी जबाबदारी'चा सर्व्हे कागदोपत्रीच ! राज्यात 16 सप्टेंबरपासून 16 हजार 903 मृत्यू

तात्या लांडगे
Wednesday, 9 December 2020


नव्याने केले तगडे नियोजन
को- मॉर्बिड रुग्णांची काळजी आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जात असतानाच संशयितांनी वेळेत उपचारासाठी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरलेल्या व्यक्‍तीच्या माध्यमातून बहुतांश को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आता को- मॉर्बिड रुग्णांच्या टेस्ट वाढविल्या असून त्यांच्यावर दैनंदिन वॉच ठेवला जाईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सोलापूर : राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक कोरोनाचे बळी ठरु नयेत म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 15 सप्टेंबरला 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु केली. को- मॉर्बिड रुग्णांचा स्वतंत्र सर्व्हे करुन त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी, असे अपेक्षित आहे. मात्र, 16 सप्टेंबरनंतर 7 डिसेंबरपर्यंत राज्यातील 16 हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात 70 टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्‍ती को- मॉर्बिड आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेनंतरची स्थिती
(16 सप्टेंबर)
एकूण रुग्ण
11,18,338
एकूण मृत्यू
30,924
(8 डिसेंबर)
एकूण रुग्ण
18,59,367
एकूण मृत्यू
47,827

राज्यात सुमारे 83 लाखांहून अधिक को-मॉर्बिड रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक 10 हजार 914 रुग्णांचा पुण्यात सात हजार 582 आणि ठाण्यात पाच हजार 368 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी अठराशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचे नियोजन अधिकाऱ्यांनी कागदावरच केल्याचे चित्र आहे. को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांची मदत घेतली जात असून अनेकजण सर्व्हे करणाऱ्यांना घरीच येऊ देत नाहीत. मात्र, सोलापूर शहरातील काही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे अर्ज अंदाजे भरल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर तर दुसरा टप्पा 12 ऑक्‍टोबर ते 25 ऑक्‍टोबर या काळात पार पडला. आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत काम सुरु झाले आहे. मात्र, घराबाहेरुनच होणाऱ्या सर्वेक्षणामुळे को- मॉर्बिड रुग्णांच्या मृत्यूची संख्या म्हणावी तशी कमी झालीच नाही.

नव्याने केले तगडे नियोजन
को- मॉर्बिड रुग्णांची काळजी आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेतली जात असतानाच संशयितांनी वेळेत उपचारासाठी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरलेल्या व्यक्‍तीच्या माध्यमातून बहुतांश को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आता को- मॉर्बिड रुग्णांच्या टेस्ट वाढविल्या असून त्यांच्यावर दैनंदिन वॉच ठेवला जाईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'My family, my responsibility' survey has been done! 16,850 deaths in the state since September 16