esakal | हायटेक टोळीबाबत मोठा खुलासा, तब्बल १० राज्यातील ATM फोडून लाखो रुपये लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

atm

हायटेक टोळीबाबत मोठा खुलासा, तब्बल १० राज्यातील ATM फोडले

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दोन दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी (nagpur police) एटीएम फोडणारी हायटेक टोळी पकडली. त्याबाबत आता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले, या टोळीने जवळपास दहा राज्यातील एसबीआयचे एटीएम (atm hackers gang) फोडून लाखो रुपये लंपास केल्याची शक्यता आहे. तसेच याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे कुमार यांनी सांगितले. (nagpur police arrtested hackers gang tageted sbi atm in 10 states)

हेही वाचा: कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर

आरबीआयने एसबीआयच्या एटीएमच्या सुरक्षेबाबत सतर्क करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये एटीएम फोडून साडेसहा लाख रुपये लंपास केले होते. त्यामागे देखील याच टोळीचा हात होता, असेही कुमार यांनी सांगितले.

एसबीआय बॅंकेचे एटीएम शोधायचे. हायटेक पद्धतीचा वापर करून एटीएममधून रक्कम काढायची. परंतु, ती रक्कम कुणाच्याही खात्यातून वजा होणार नाही, अशी व्यवस्था एटीएममध्ये करायची. त्यामुळे कुणीही ग्राहक तक्रार करणार नाही. तर हायटेक चोरांच्या खिशात बॅंकेची रक्कम जात होती. अशी पध्दत वापरणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीला नागपूर पोलिसांनी जयपूरमधून अटक केली. अनिसखान अब्दुल गफ्फूर (२६) आणि मो. तारीफ उमर (२३) दोन्ही रा. पलावल (हरियाणा) अशी या आरोपींची नावे आहेत.

१४ ते १६ जून दरम्यान या आरोपी व त्यांच्या साथीदारांनी स्टेट बँकेच्या एटीएमला आपले लक्ष्य केले होते. बजाजनगर, प्रतापनगर, गणेशपेठ आणि लकडगंज येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून आयडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डद्वारे ६ लाख ७५ हजार रुपये काढून फसवणूक केली होती. चारही ठिकाणी एकाच टोळीने गंडा घातल्याचे लक्षात आले होते. मात्र, एका एटीएममध्ये जात असताना आरोपी हे आरजे ४० सीए ७१५४ क्रमांकाच्या हुंदाई कारने गेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. सातत्याने या घटना होत असल्याने पोलिस देखील हतबल झाले होते. त्यासाठी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांनी एक पथक तयार केले. ज्या एटीएम कार्डमधून पैसे काढण्यात ते कार्ड पल्लवल (हरीयाणा) येथून देण्यात आले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरोपी हे हरियाणाचे आहेत हे निश्चित झाले होते. मात्र, हुंदाई कार राजस्थान पासिंग असल्याने पोलिस पेचात पडले होते. पोलिसांनी सदर हुंदाई कारचा राजस्थान आरटीओमधून शोध घेतला असता ही कार बँकेतून कर्ज काढून घेतल्याचे समजले. पोलिसांनी त्या बँकेत तपास केला असता आरोपींचे दोन मोबाईल क्रमांक मिळून आले. नागपूर पोलिसांनी मेवाड (राजस्थान) पोलिसांच्या मदतीने आरोपींचे लोकेशन घेतले असता जयपूर येथून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

loading image