
जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या शिवनी जामगा येथे क्षुल्लक कारणावरुन बौद्ध समाजावर हल्ला करण्यात आला होता.
नांदेड : महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारने त्या तात्काळ थांबवाव्यात असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. दोन) नांदेड जिल्ह्यातील शिवनी जामगा येथे केले आहे.
जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या शिवनी जामगा येथे क्षुल्लक कारणावरुन बौद्ध समाजावर हल्ला करण्यात आला होता. गणेश येडके या तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याला गंभीर जखमी केले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणावरुन पडसाद उमटले असून अनेक आंबेडकरी नेत्यांनी या गावाला भेटी दिल्या. त्या घटनेचा निषेध करत ता. 23 रोजी लोहा शहर बंद पुकारण्यात आले होते. मंगळवारी रामदास आठवले यांनी या गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी आठवले यांनी गणेश येडके याच्या परिवारासोबत संवाद साधला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या पाठीशी असल्याचे यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा - विधायक बातमी : उपक्रमशील शिक्षिका शितल मापारी यांचे योगदान
राज्यात मागासवर्गीय दलित समाजावर होत असलेल्या अत्याचाराबाबत राज्य सरकारने व स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावीत व राज्यातील अत्याचार थांबवावेत असे प्रतिपादन केले. रामदास आठवले हे मंगळवारी सकाळी अकरा वाजता या गावात दाखल झाले व गावातील पीडित कुटुंबाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यउपाध्यक्ष विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.