नारायण राणेंचे अखेर ठरले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शिवसेनेतला प्रवेश, बाळासाहेबांवरील भक्ती, उद्धवजींबद्दलची नाराजी अशी या पुस्तकातील प्रकरणे तर वाचनीय आहेतच. पण, काँग्रेस नेत्या स्व. प्रभाताई राव, मार्गारेट अल्वा यांचेबद्दलही त्यांनी लिहिले आहे. सेनेला या पुस्तकाचा राग आहेच, त्यामुळे फडणवीस यांनी हजर रहाणे टाळले असावे असे म्हणतात.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रॅण्ड नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे अखेर ठरले. हो नाही म्हणता म्हणता अखेर तारखा मिळाल्या. मंडळी असे गोंधळात पडू नका. त्यांनी अद्याप ना भाजपत प्रवेशाचा दिवस ठरवलाय ना काँग्रेसमध्ये परतण्याचा.

राणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला वेळ मिळत नव्हता, नेते तयार नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्षा करून झाली अखेर त्यांनी काहीच कमिट न केल्याने आता भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या आत्मकहाणीचे प्रकाशन होणार आहे. या कहाणीचे इंग्रजी रूप या अगोदरच प्रकाशित झाले आहे.

शिवसेनेतला प्रवेश, बाळासाहेबांवरील भक्ती, उद्धवजींबद्दलची नाराजी अशी या पुस्तकातील प्रकरणे तर वाचनीय आहेतच. पण, काँग्रेस नेत्या स्व. प्रभाताई राव, मार्गारेट अल्वा यांचेबद्दलही त्यांनी लिहिले आहे. सेनेला या पुस्तकाचा राग आहेच, त्यामुळे फडणवीस यांनी हजर रहाणे टाळले असावे असे म्हणतात. पण शिवसेनेच्या दातात हात घालण्याचे कर्तब गाजवलेल्या आशीष शेलार मात्र समारंभाला हजर असतील.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हेही बिनधास्त नेते राणेंच्या कोकणातले ते या कार्यक्रमाला हजर रहातील. सेना आणि काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे पत्रिकेवर तरी नाव नाही. हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात येत्या शुक्रवारी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane biography publication in Mumbai