Narendra Modi : संसद बांधली पण लोकशाही कुठे आहे? सीताराम येचुरी यांचा सवाल | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sitaram Yechury and narendra modi

Narendra Modi : संसद बांधली पण लोकशाही कुठे आहे? सीताराम येचुरी यांचा सवाल

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजेशाहीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांची स्थिती अधिक खराब होत चालली आहे. नव्या संसद इमारतीचा गाजावाजा होत असला तरी सांसदीय व लोकशाही प्रणालीचे तीन तेरा वाजवले जात आहेत.

विविध राज्यातील भाजपाचे पराभव लक्षात घेत देशपातळीवर भाजपविरोधी पक्षांनी एकत्र आल्यास चित्र बदलू शकते असे मत कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

देशाची स्थिती कालच्या आर्थिक आकडेवारीवरून लक्षात येते. औद्योगीक विकासाचा दर ९. ५ वरून ३. ३ टक्क्यावर पोहोचला आहे. लघु उद्योगाची स्थिती तर अधिकच वाईट आहे. महागाई वाढत असताना सरकार जनतेकडून करवसुली करत आहे.

उद्योगाची वाईट अवस्थेमुळे बेरोजगारी वाढली आहे. एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपी दराबाबत दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. बदलत्या निसर्गाने शेतकऱ्याची स्थिती बिघडत चालली आहे.

एक महिन्याच्या संघर्षानंतर मणीपूरला गृहमंत्री पोहचले आहेत. संसद इमारतीचे उदघाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय लोकशाही कुठे आहे हे पाहावे. मोदींनी जनतेचे हाल समजून न घेता राजेशाहीकडे वाटचाल केली आहे. राजेशाहीत राजा व प्रजा संबंध होते पण लोकशाहीत नागरिकांचा सत्तेशी काही संबंध राहिला नाही.

संसदेत कायदे करणे, जनतेच्या प्रश्वावर चर्चा करणे, सयुंक्त सांसदीय समित्यांचे कामकाज प्रभावी होणे या गोष्टी जवळपास बंदच झाल्या आहेत. अवघ्या साठ मिनिटात कोणतीही चर्चा न करता ५० लाख कोटीचा अर्थसंकल्प मंजूर केला जातो. संसदेत विचारलेले प्रश्न रेकार्डमधून काढले जात आहेत. २११ दिवस काम करणाऱ्या संसदेचे कामकाज फक्त ५६ दिवस चालले. या उलट विरोधकांवर ईडीने ५७०२ गुन्हे नोंदवले त्यापैकी २७ जणांना शिक्षा झाली. त्यामुळे सांसदीय लोकशाही कुठेही आढळत नाही.

भाजप विरोधकांनी देश वाचवण्यासाठी त्रिसूत्रीनुसार कार्य करायला हवे. ज्या मुद्द्यांवर सर्वांची सहमती असेल त्यावर एकत्र काम करावे. जनसामान्यांच्या समस्यांवर आंदोलन चालवावे. स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची तयारी करावी. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत, कर्नाटकात भाजपचा पराभव उघडपणे जनतेचा कौल देणारा आहे. १२ जून ला नीतिशकुमार यांच्यासोबत आम्ही एकत्र चर्चा करणार आहोत. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक ढवळे, राज्य सचिव उदय नारकर, एम.एच.शेख, ॲड अऩिल वासम उपस्थित होते.

नाव बदलणे म्हणजे ध्रुवीकरण वाढवणे

भाजप सातत्याने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण विविध मुद्द्यावर वाढते राहील यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शहराची नावे बदलण्याचा प्रकार यातूनच केला जात आहे. शहराची नावे बदलल्याने संस्कृती व इतिहास बदलला जात नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :BjpNarendra Modi