Nashik Bus Fire : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करू; मुख्यमंत्री शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik bus fire cm eknath shinde inspects nashik bus accident site

Nashik Bus Fire : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करू; मुख्यमंत्री शिंदे

नाशिक : नाशिक - औरंगाबाद रोडवरील अपघातामध्ये बसला लागलेल्या आगीत होरपळून १२ प्रवाशांचा झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या गंभीर घटनेची सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नियोजित आळंदी (जि. पुणे) दौरा रद्द करीत नाशिककडे प्रयाण केले. ओझर विमानतळावर ते दुपारी दाखल झाले. अपघातस्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस करीत प्रत्यक्ष घटनेची माहिती जाणून घेतली.रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात चर्चा करून शिंदे यांनी सूचना केल्या.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ही अत्यंत दुर्दैवी घटना असून. अशा स्वरूपाच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात येईल. तसेच प्रत्येक शहरातील अपघातांच्या जागांची माहिती घेऊन त्याठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबत पोलिस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. या अपघातातील कोणालाही शासन वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर होणाऱ्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय खर्चाचा भार शासन उचलणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. गंभीर रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याच्या वा त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासंदर्भात सूचना केल्या.