Navneet and Ravi rana I 'उद्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणार', राणा दाम्पत्य ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Notice To Navneet Rana and Ravi Rana

'उद्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणार', राणा दाम्पत्य ठाम

राणा दाम्पत्य खारच्या निवासस्थानी पोहचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'कोणामध्ये किती दम आहे?' नवनीत राणांचं शिवसैनिकांना आव्हान

तुम्ही राज्याचे प्रथम नागरिक आहात. हनुमान जयंती होती त्यावेळी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाराष्ट्रातील संकट घालविण्यासाठी प्रार्थना केली नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कधी भाष्य करत नाही. मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात जातात, तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला? याचा विचार करा. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकत मोठे झाले आहोत. आज बाळासाहेबांची तिसरी पिढी राजकारणात आहे. मी मुंबईची मुलगी असून विदर्भाची सून आहे. सर्व ताकद माझ्यासोबत आहे. कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही, असा इशारा खासदार नवनीत राणांनी शिवसैनिकांनी दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक करत आहेत. त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे. आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसेचं पठण करणार. आता शिवसैनिक की हनुमान चालिसेत दम आहे हे उद्या दिसणार आहे. माझ्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. शिवसेनेला हरवूनच मी खासदार झाले आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

संजय राऊत पोपट आहेत. दररोज सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलतात. आम्हाला हनुमान चालिसेचं पठण करण्यापासून उद्धव ठाकरे देखील रोखू शकत नाहीत.

म्हणूनच शिवसैनिकांवर रस्त्यावर बसण्याची वेळ : आमदार रवी राणा

बाळासाहेबांना हृदयात ठेवून आम्ही चालतो. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही. कार्यकर्त्यांनी मुंबईत येऊ नये, असं आवाहन रवी राणा यांनी केलं. सर्व रामभक्तांनी तिथेच थांबावे, अशी विनंती त्यांना करतो, असंही राणा म्हणाले. शिवसैनिक हनुमान चालिसा वाचत नाहीत. त्यामुळे असं रस्त्यावर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका देखील आमदार रवी राणा यांनी केली.

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम -

आम्ही मातोश्रीची वारी करणार आहे. आम्हाला शिवसैनिकांचा सामना करावा लागला तरी चालेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदूत्वाचा वापर करून मतं मागतात. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. आम्ही उद्या ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार आहोत. बाळासाहेब असते तर आम्हाला एक नाहीतर १०० वेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती, असं रवी राणा म्हणाले.

आमदार रवी राणा -

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे त्यांनी हनुमान चालिसा वाचावी असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं. बाळासाहेबांवर श्रद्धा असेल तर तुम्ही पठण कराल. तुम्ही हिंदूत्वाची दिशा सोडून दुसऱ्या दिशेने जात आहेत. महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे, असं आमदार रवी राणा म्हणाले.

पोलिसांचा माध्यमांसोबत संवाद -

मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करू नका, अशी विनंती राणा दाम्पत्याला केली आहे. तशी नोटीस त्यांना दिली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेऊ, असं पोलिसांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याला नोटीस -

राणा दाम्पत्याला भेटून पोलिसांनी नोटीस दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचता येणार नाही, असं पोलिसांनी नोटीशीमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी आमदार रवी राणा यांना दिलेली नोटीस

पोलिसांनी आमदार रवी राणा यांना दिलेली नोटीस

खासदारांना नवनीत राणा यांना दिलेली नोटीस

खासदारांना नवनीत राणा यांना दिलेली नोटीस

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांची मुंबई टोल नाक्यांवर फिल्डिंग

नवनीत राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईच्या टोल नाक्यांवर देखील फिल्डिंग लावली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांना मुंबईत प्रवेश करू द्यायचा नाही असा चंगच शिवसैनिकांनी बांधला होता. दरम्यान, मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावरही शिवसैनिक जमा झाले होते. परंतु नवनीत राणा या मुंबईत दाखल झाल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठलं आहे.

मुंबई पोलिसांकडून राणांचा शोध सुरू

राणा दांपत्य हे आज गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, खार पोलिसांना ते सहकार्य करत नाहीत, अशी माहिती समोर येत आहेत. खार पोलिसांनी वेळोवेळी दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस दोघांनाही सीआरपीसी १४९ नुसार नोटीस बजावणार असल्याचेही स्पष्ट केलं आहे.

राणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - विनायक राऊत

सकाळी विमानाने 9:30 ला मुंबईत राणा दांपत्य दाखल झाले आहेत. मुंबईत राणा दांपत्य कुठे आहेत याचा शोध मुंबई पोलिस आणि शिवसैनिक घेत आहेत. खासदार नवनीत राणा खार येथील नंदगिरी गेस्ट हाऊसवर येणार होत्या त्यांची 10 वाजता या गेस्ट हाऊस वर बुकिंग होती. मात्र त्याही ठिकाणी त्या आलेल्या नाहीत तर खार वेस्ट 14 रोड येथील व्हिला बिल्डिंगमधील घरी राणा दांपत्य आलेत का याची पाहणी कारण्यासाठी ही शिवसैनिक दाखल झाले आहेत

मागील काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठण याविषयावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) या निवास स्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) आज (ता. २२) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. परंतु या दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेननं आक्रमक पवित्रा उचलला असूनही चानक राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले आहेत.

राणा दाम्पत्य अचानक मुंबईत दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा गनिमी काव्याने मुंबईत आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उद्या (ता. २३) ते मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करणार आहेत. दरम्यान, आता मुंबईतील शिवसैनिक हे शासकिय विश्रामगृह येथे दाखल झाले असून ते येतात हेच बघतो, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

Web Title: Navneet Rana And Ravi Rana Arrives In Mumbai For Hanuman Chalisa Pathan Live Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..