Navneet Rana Discharge|"लढा सुरूच ठेवणार"; डिस्चार्जनंतर नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात कसली कंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana
"लढा सुरूच ठेवणार"; डिस्चार्जनंतर नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात कसली कंबर

"लढा सुरूच ठेवणार"; डिस्चार्जनंतर नवनीत राणांनी ठाकरेंविरोधात कसली कंबर

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आलं.

यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. मी अशी कोणती चूक केली, जिची मला शिक्षा मिळाली, असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. राणा म्हणाल्या, हनुमान चालिसा पठण, रामाचं नाव घेणं, गुन्हा आहे, त्यासाठी मला १३-१४ दिवस शिक्षा सरकारने दिलीये. जर हा गुन्हा आहे तर मी १४ वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही महिला १४ दिवसांत शांत बसेल तर लक्षात घ्या तुम्हील १४ दिवसांत महिलेचा आवाज दाबू शकणार नाही. ही लढाई देवाच्या नावाची आहे, ही लढाई पुढेही सुरू ठेवणार. ज्या पद्धतीने माझ्यावर कारवाई झाली, जनतेने महिलेवर केलेली ती क्रूर कारवाई पाहिलीये, सर्वांना त्याबद्दल खेद आहे.

राणा पुढे म्हणाल्या, " ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आहे. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी. त्यांच्याविरोधात एक महिला उभी राहील. तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, मी तुमच्या विरोधात असेन हा माझा इशारा आहे. माझ्यावर त्यांनी जे अत्याचार केलेत, त्याचं उत्तर पुढच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनताच देईल. ठाकरेंची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी उभी राहीन आणि शिवसेनेविरोधात प्रचार करीन."