
नवनीत राणांच्या ‘एमआरआय’चे फोटो व्हायरल
मुंबई : नायर रुग्णालयाच्या एमआरआय कक्षात ऑक्सिजन सिलिंडर हाताने पकडल्याने २०१८ मध्ये राजेश मारू यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने एमआरआय यंत्रणेजवळ धातूच्या किंवा चुंबकीय वस्तू न नेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या; मात्र खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयात करण्यात आलेल्या एमआरआयवेळचे छायाचित्र व्हायरल झाल्याने मार्गदर्शक सूचनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘हनुमान चालिसा’प्रकरणी न्यायालयीन कोठडीतून सुटल्यावर प्रकृती खालावल्याने खासदार नवनीत राणा दोन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तेव्हापासून राणा यांचे रुग्णालयातील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. वैद्यकीय तपासणी सुरू असताना नवनीत राणांच्या फेसबुकवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. एमआरआय कक्षात धातू, चुंबक, दागिने, काचेची वस्तू बाहेर काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात, तसेच प्रवेशद्वारावर नमूद केलेले असते; मात्र नवनीत राणांना हे नियम लागू होत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एमआरआय यंत्रामध्ये रुग्णाची चाचणी सुरू असल्यास कोणतीही चुंबकीय वस्तू आत नेता येत नाही. शिवाय एमआरआय कक्षात छायाचित्र काढणे धोकादायक आहे. चुंबकीय क्षेत्रामुळे यंत्रामध्ये एखादी व्यक्ती अडकण्याची किंवा चिकटण्याची शक्यता असते. तसेच डॉक्टरांशिवाय तेथे इतरांना प्रवेशही नसतो.
- डॉ. रमेश भारमल, माजी अधिष्ठाता, नायर रुग्णालय
Web Title: Navneet Rana Mri Photo Viral Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..