वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede-nawab malik
समीर वानखेडेंसह कुटुंबियांविरोधात नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांच्या मालिकेला आता ब्रेक लागणार आहे. मलिक यांनी तसं आश्वासनं मुंबई हायकोर्टात दिलं आहे. असं नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

हायकोर्टानं नवाब मलिक यांच्याकडे विचारणा करताना म्हटलं की, "तुम्ही वानखेडे यांच्याविरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार नोंदवली आहे का? जर तुम्हाला तक्रार नोंदवाची नसेल तर माध्यमांमधून याबाबत सातत्यानं विधान करताना मीडिया पब्लिसिटीमागचा तुमचा काय हेतू आहे? खंडपीठानं म्हटलं की, मलिकांचं ट्विट हे एखाद्या मंत्र्याला शोभणारं नाही, ते द्वेषभावनेतून आल्यासारखं वाटतं आहे. मंत्री अशा प्रकारे का वागत आहेत? ते असं का वागत आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे? हे दुष्टपणाशिवाय दुसरं काही नाही" समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टाच्या एकल खंडपीठानं दिलेल्या निर्णयाविरोधात अपिल केलं असून यावर सुनावणी सुरु असताना कोर्टानं मलिकांना खडसावलं. सातत्यानं बदनामीकारक आरोप करण्यापासून मलिकांना रोखण्यात यावं यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, त्यावर २२ नोव्हेंबर रोजी कोर्टानं असा आदेश देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, खंडपीठानं मलिक यांना खडसावल्यानंतर मलिकांनी हायकोर्टाला अश्वस्त केलं की, "वानखेडे प्रकरणाच्या अंतिम सुनावणीपर्यंत अर्थात ९ डिसेंबरपर्यंत मी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कुठलंही सार्वजनिक विधान आणि ट्विट करणार नाही."तत्पूर्वी, मलिक यांनी आज पुन्हा एकदा वानखेडे यांच्या कुटुंबियांवर नव्यानं आरोप करत समीर वानखेडे यांच्या आईला टार्गेट केलं.

वानखेडेंनी स्वतःच्या आईचा बनावट मृत्यू दाखला तयार केला - मलिक

नवाब मलिक यांनी नव्यानं आरोप करताना म्हटलं की, "समीर वानखेडे यांच्या आई झहीदा दाऊद वानखेडे यांची दोन मृत्यू प्रमाणपत्र आहेत. या दोन्ही प्रमाणपत्रांमध्ये त्यांच्या दोन भिन्न धर्मांची नोंद आहे. समीर वानखेडे यांनी ही दोन्ही बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दोन्ही मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रती शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आणखी एक फसवणूक! दफनविधीसाठी मुस्लीम तर अधिकृत कागदपत्रांसाठी हिंदू धर्म. दाऊद ज्ञानदेव यांचा हा आशीर्वाद आहे.

loading image
go to top