Nawab Malik | "आर्यन खानच्या अपहरणाचा कट उधळला, कोर्टाच्या निर्णयानंतर पर्दाफाश" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

"आर्यन खानच्या अपहरणाचा कट उधळला, कोर्टाच्या निर्णयानंतर पर्दाफाश"

हायकोर्टाच्या निर्णयानंतर आर्यन खानचं अपहरण झाल्याचं सिद्ध झालं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलंय. या प्रकरणात शाहरुख खानकडून खंडणी वसूल होणार असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मलिकांनी स्पष्ट केलंय.

हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते. परंतु सार्वजनिक डोमेनमध्ये रिलीज केलेल्या सेल्फीमुळे योजना अयशस्वी झाली, असं मलिकांनी म्हटलं. फर्जीवाडा आता उघड्यावर आला, असं ते म्हणाले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केलंय. हायकोर्टच्या निकालात ड्रग्जच्या कटाचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तो समीर दाऊद वानखेडेचा फर्जिवाडा होता, हे खरेच सिद्ध झाले आहे, असं मलिक म्हणाले. हे अपहरण आणि खंडणीचे प्रकरण होते. पण एका सेल्फी लीकमुळे ही योजना फसली, असं मलिकांनी नमूद केलं.

काय म्हणालं न्यायालय? केवळ अमलीपदार्थ असलेल्या क्रुझवर प्रवास करत होते म्हणून आर्यन खानसह तिघाजणांविरोधात कटकारस्थानाचा गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावा सिध्द होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. आर्यनच्या व्हौटसप चैटमध्येही आक्षेपार्ह असे काही नाही, असे ही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. सुपरस्टार शाहरूख खान चा मुलगा आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने अमलीपदार्थ प्रकरणात जामिन मंजूर केला आहे. यासंबंधीचे न्या नितीन सांब्रे यांनी दिलेले चौदा पानी निकालपत्र आज उपलब्ध झाले आहे. आर्यनकडे काहीही आक्षेपार्ह अमलीपदार्थ सापडले नाहीत हे स्पष्ट झाले आहे. अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अल्प प्रमाणात अमलीपदार्थ सापडले असे ही यामध्ये नमूद केले आहे.

कटकारस्थानाचा गुन्हा आरोपींवर दाखल होण्यासाठी किमान पुरेसा सबळ पुरावा अभियोग पक्षाकडे असणे आवश्यक आहे, मात्र हा पुरावाच यामध्ये उपलब्ध नाही. कट करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक परिस्थिती आणि त्यानुसार केलेली रणनीती यामध्ये दिसत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या एनडिपीएस कायद्याच्या कलम 29 नुसार यामध्ये एक वर्ष कारावासाची शिक्षा असली तरी तिनही आरोपी यापूर्वीच पंचवीस दिवस कारागृहात होते, यामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही, असे यामध्ये नोंदविले आहे.

loading image
go to top