esakal | ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात येतोय

ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्याच्या दौर्यावर असणाऱ्या अजित पवार यांना पत्रकारांनी ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याचा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, ग्रामीण भागात लोकांच्या मनात कोरोनाची आता भीतीच राहिली नाही. बरेच नागरिक मास्क वापरत नाहीत. नियम पाळले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही काहीजण सार्वजनिक सण, उत्सव साजरे करून राजकारण करीत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्यास येरे माझ्या मागल्या करुन सर्वच बंद करण्याची वेळ राज्य सरकार आणि प्रशासनावर आणू नये, असा थेट इशारा दिला.

शुक्रवारी पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या परिषद अध्यक्ष पदाचा पदभार विद्याधर अनास्कर यांनी स्वीकारला . त्यावेळी अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सहकार क्षेत्रापासून वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं. तसेच सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत त्याची शिफारस परिषदेने तात्काळ करावी, सहकार परिषदेसाठी राज्य सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत त्याही सादर करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजप आणि मनसे राज्यात मंदिरे सुरू करण्याबाबत आक्रमक झाली आहेत. या संदर्भात पवार म्हणाले, कोणी किती आक्रमक व्हावे, हा त्यांचा प्रश्न आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार. सध्या मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करून काही साध्य करता येईल का, याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.

हेही वाचा: आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

देशातील काही इतर राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय, या संदर्भात पवार म्हणाले, कोरोनामुळे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, असा एक मतप्रवाह आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णदर शून्यावर आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असा दुसरा मतप्रवाह आहे. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा करून शाळा नक्की कधी सुरू करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतील.

loading image
go to top