अजून एक आमदार परतणार : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

आज प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्टिट करत अजून एक आमदार लवकरच परतेल असे सांगितले आहे.

मुंबई : कालपासून घडत असलेल्या राजकीय घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काल सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
घेतली. काही काळातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की, हा अजित पवार यांचा वैयक्तीक निर्णय आहे. या निर्णयाशी पक्षाचा काहीही संबंध नाही. यामुळे एक चित्र स्पष्ट झाले की, अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध काही आमदारांना घेऊन बंड केले. शरद पवार व उद्धव ठाकरे यांची संयुक्त प्रेस काॅन्फरन्स झाल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले एक-एक आमदार शरद पवार यांच्याकडे येऊ लागले. आज प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्टिट करत अजून एक आमदार लवकरच परतेल असे सांगितले आहे.

दरम्यान, या आमदारांना शपथ विधीबाबत कसलीच कल्पना न देता राजभवनावर घेऊन गेल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच आमदारांनी देखील चुकीची माहिती देऊन आपल्याला तिथे घेऊन गेल्याचे सांगितले आहे. तसेच या आमदारांनी आपला शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या 12 आमदारांपैकी 8 आमदार परतले आहेत, असे अधिकृतरित्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे चार आमदार असून, ते देखील लवकरच पक्षाकडे येतील असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.  तसेच आज प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्टिट करत अजून एक आमदार लवकरच परतेल असे सांगितले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासोबत एकतरी आमदार राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Another MLA to return says Nawab Malik