भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने लढले. निवडणुकीच्या काळात तरुण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती.

मुंबई : अनेकांना निवडणुकीत यश आलं नाही त्याला बरीच कारणं आहेत. आपली साधनसामग्री कमी पडली. सत्ताधाऱ्यांकडे दिल्ली व राज्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जे जिंकले त्यांनी आवाक्याबाहेर मेहनत केली आणि विजय मिळवला. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

आज (रविवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांना यश मिळू शकलं नाही अशा उमेदवारांशी शरद पवार यांनी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने लढले. निवडणुकीच्या काळात तरुण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती. अनेकांनी वंचितने नुकसान केले असे सांगितले. समाजातील गरीब वर्ग वंचितच्या माध्यमातून संघटित झाला आहे. आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे. आतापर्यंत हा वर्ग आपल्या सोबतच होता. काही कारणाने हा समाज आपल्यापासून दुरावला गेला. हा समाज आपल्या सोबत कसा येईल त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी आपण त्यांना धीर देण्यासाठी बांधावर गेले पाहिजे. मी नाशिकला गेलो तेव्हा एक आदिवासी महिला म्हणाली की आधी मोदींना हटवा. हा असंतोष लोकांच्या मनात आहे. त्यांना विश्वास आहे की आपणच ही परिस्थिती हाताळू शकतो. काही ठिकाणी संघटनात्मक कामात आपण कमी पडलो. शहरांमध्ये आपल्या जागा कमी आल्या. एकेकाळी शहरांमध्ये आपली ताकद होती. निवडणुकीत यश आलं नाही तरी तुमच्यावर येत्या काळात महत्त्वाची जबाबदारी टाकली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तुम्हाला जनतेच्या मनात रुजवायचे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar meet defeated candidates in Mumbai